शांती आणि विकासाचे नवे युग; उत्तर बस्तर आणि अबूझमाड नक्षलमुक्त- मुख्यमंत्री विष्णुदेव साय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:59 IST2025-10-29T12:59:15+5:302025-10-29T12:59:35+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नक्षल निर्मूलन मोहीम ऐतिहासिक यशाकडे वाटचाल करत आहे.

शांती आणि विकासाचे नवे युग; उत्तर बस्तर आणि अबूझमाड नक्षलमुक्त- मुख्यमंत्री विष्णुदेव साय
रायपूर-छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी म्हटले की, उत्तर बस्तर आणि अबूझमाडचा नक्षलमुक्त प्रदेश बनणे हे सिद्ध करते की, आता बस्तर भयाचे नव्हे, तर विश्वास आणि विकासाचे प्रतीक बनले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भारत आज नक्षलवादाच्या अंताच्या उंबरठ्यावर उभा आहे.
दोन दिवसांत २५८ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
मुख्यमंत्री साय यांनी पुढे सांगितले की, मागील दोन दिवसांत २५८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, हे बंदुकीच्या नव्हे तर विश्वासाच्या शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. त्यांच्या मते, गेल्या २२ महिन्यांत ४७७ नक्षलवादी ठार, २११० आत्मसमर्पण आणि १७८५ अटक या आकडेवारीमुळे छत्तीसगड सरकारचा नक्षलमुक्त राज्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
३१ मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगड नक्षलमुक्त करण्याचे लक्ष्य
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ३१ मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण छत्तीसगड नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट आता अगदी जवळ आले आहे. हे परिवर्तन राज्य सरकारच्या “नक्सलवादी आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरण २०२५” तसेच “नियद नेल्ला नार योजने”च्या यशस्वी अंमलबजावणीमुळे शक्य झाले आहे.
डबल इंजिन सरकारच्या संवेदनशील धोरणांमुळे, बस्तरमध्ये वाढणाऱ्या सुरक्षा छावण्यांमुळे आणि शासनावरील विश्वासामुळे हा बदल घडला आहे. आतापर्यंत नक्षलप्रभावित भागांत ६४ नवीन सुरक्षा कॅम्प उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे सुरक्षा तसेच विकासाची किरणे गावागावात पोहोचत आहेत.
वीर जवानांच्या शौर्याला मुख्यमंत्रींचा सलाम
मुख्यमंत्री साय यांनी सुरक्षाबलांच्या अदम्य धैर्य आणि बलिदानाला नमन करत म्हटले की त्यांच्या समर्पणामुळेच आज बस्तर भयमुक्त झाला असून शांततेच्या मार्गावर वाटचाल करत आहे. त्यांनी सांगितले की, अबूझमाड आणि उत्तर बस्तर पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहेत, तर दक्षिण बस्तरात निर्णायक लढाई सुरू आहे. “नियद नेल्ला नार” सारख्या योजनांनी बस्तरात संवाद, विकास आणि संवेदनशीलतेची नवी पायवाट घातली आहे.
सरकारचा स्पष्ट संदेश
मुख्यमंत्री साय यांनी स्पष्ट केले की, सरकारची धोरणे अगदी स्पष्ट आहेत, हिंसेला कोणतीही जागा नाही. जे नक्षलवादी शांती आणि विकासाचा मार्ग स्वीकारतील त्यांचे स्वागत आहे; पण जे बंदूक उचलून समाजात भय निर्माण करतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन करत म्हटले की, “हिंसेचा मार्ग अंतहीन वेदना देतो; पण आत्मसमर्पण जीवनाला नवी दिशा आणि नव्या सुरुवातीची संधी देतो. आपल्या मातृभूमीच्या भविष्याकरिता आणि आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शस्त्रे खाली ठेवा आणि विकासाच्या प्रकाशात या.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर पोस्ट करून सांगितले की, छत्तीसगडमधील अबूझमाड आणि उत्तर बस्तर, जे कधी नक्षल दहशतीचे गढ होते, आता पूर्णपणे नक्षलमुक्त घोषित झाले आहेत. हा केवळ भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा विजय नाही, तर विकास, विश्वास आणि संवेदनेची नवी कहाणी आहे. गेल्या दोन दिवसांत देशभरात २५८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, हे त्याचे मोठे उदाहरण आहे. त्यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांचे स्वागत करत त्यांना देशाच्या एकतेत सहभागी होण्याचे आवाहन केले.