विभागीय क्रीडा संकुलाची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:04 IST2017-12-23T01:03:41+5:302017-12-23T01:04:05+5:30
राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलाची चांगलीच झाडाझडती घेतली. यादरम्यान त्यांनी स्वच्छतेविषयी उपस्थित कर्मचाºयांची कानउघाडणीही केली. तसेच अनेक सूचनादेखील केल्या.

विभागीय क्रीडा संकुलाची झाडाझडती
औरंगाबाद : राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलाची चांगलीच झाडाझडती घेतली. यादरम्यान त्यांनी स्वच्छतेविषयी उपस्थित कर्मचाºयांची कानउघाडणीही केली. तसेच अनेक सूचनादेखील केल्या.
औरंगाबाद येथे दौºयावर आलले राज्य क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी केली. याप्रसंगी सूतगिरणी येथील ४ ते ५ एकर जागा ताब्यात घेऊन त्यावर स्विमिंगपूल उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे सिंथेटिक ट्रॅकचा प्रस्तावही पाठविल्याची माहिती सुनील केंद्रेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यावेळी क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंना नियमानुसार आहार मिळण्याविषयी छेडले असता आपण आताच क्रीडा प्रबोधिनीतील मुलांशी चर्चा केली असून त्यांना नियमानुसार आहार दिला जात असल्याचे केंद्रेकर यांनी सांगितले. विभागीय क्रीडा संकुलात अनेक खोल्या रिकाम्या असून, त्या धूळखात पडल्या आहेत. त्याचा उपयोग होत नसल्याविषयी केंद्रेकर यांना विचारले असता ते म्हणाले, आता खोल्या रिकाम्या असल्या तरी त्या ज्या उद्देशासाठी आहे त्याच उद्देशासाठी त्याचा उपयोग होईल; परंतु या खोल्या स्वच्छ ठेवण्यात येऊन त्याची निगा राखली जाईल.’’
भल्या पहाटे विभागीय क्रीडा संकुलावर वॉकिंग व रनिंग करणाºयांची संख्या जास्त असते आणि येथे धावताना धूळ उडते याविषयी केंद्रेकर यांनी सिंथेटिक ट्रॅक उभारल्यास हा प्रश्न उद्भवणार नसल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी इनडोअर स्टेडियमवर नॅचरल सनलाईटची व्यवस्था करण्यात यावी याविषयीही केंद्रेकर यांनी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड आणि क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांना सूचना दिल्या. यावेळी क्रीडा प्रबोधिनीचे अॅथलेटिक्स प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांनी मानधन मिळत नसल्याचे केंद्रेकर यांच्या लक्षात आणून दिले. अशाच प्रकारची तक्रार क्रीडा प्रबोधिनीतील एका कर्मचाºयानेदेखील मांडली.
याप्रसंगी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, भाऊराव वीर, सचिन पुरी, क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे, गोकूळ तांदळे, जिम्नॅस्टिकच्या प्रशिक्षिका तनुजा गाढवे, सुभाष मुरकुंडे, कृष्णा केंद्रे, राज्य स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांड्रे आदी उपस्थित होते.
विजेची बचत, स्वच्छतेवर भर
याप्रसंगी केंद्रेकर यांनी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांना सूचना देताना विजेची बचत आणि स्वच्छतेवर जास्त भर दिला. आवश्यकतेनुसारच विजेचा उपयोग करण्यात यावा आणि विभागीय क्रीडा संकुलात कचरा दिसता कामा नये. यासाठी डस्बीन ठेवले जावे. तसेच क्रीडा संकुल आपलेच आपणच स्वच्छ राखा, नसता दंड करण्यात येईल असे फलक संकुलात लावावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.