जि.प. सेमी इंग्रजी शाळांचा दबदबा
By Admin | Updated: July 15, 2016 01:04 IST2016-07-15T00:12:22+5:302016-07-15T01:04:38+5:30
अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी पैशामध्ये इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे

जि.प. सेमी इंग्रजी शाळांचा दबदबा
अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी पैशामध्ये इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जि.प. प्रशासनाने अंबाजोगाई तालुक्यात ८३ सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले. या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशाची संख्या वषार् गणिक वाढत चालली असून, जि.प. शाळा थेट खाजगी इंग्रजी शाळांना आव्हान देत आहेत. तालुक्यातील ३२ शाळांमध्ये ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध झाली आहे.
आज स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषा ही मुख्य ज्ञान भाषा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजी विषयाच्या शिक्षणापासून वंचित राहू नये, शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबर तो स्पर्धेत अग्रेसर राहिला पाहिजे. या उद्देशाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजीची सुरुवात झाली आहे. इयत्ता पहिलीपासूनच इंग्रजी विषयाचे आकलन झाल्यास आगामी काळात विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयांबद्दल भीती राहणार नाही. तसेच इंग्रजीच्या शिक्षणासाठी शहराकडे जाण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही. तसेच सामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मोफत मिळाले पाहिजे. या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमीचा अभ्यासक्रम सुरू झाल्याने याचा परिणाम परिसरातील खाजगी शाळांवर होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जर दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच मिळू लागले तर इतरत्र स्थलांतर करण्याची गरज पालकांवर राहिली नाही.
याविषयी बोलताना गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दर्जेदार व संस्कारक्षम शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इंग्रजी शिक्षणाबद्दल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर होऊन स्पर्धेत हे विद्यार्थी टिकले पाहिजेत. या उद्देशाने इयत्ता पहिलीपासूनच सेमी इंग्रजी सुरू करण्यात आले आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये ठेवावे.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. आशा संजय दौंड लोकमतशी बोलतांना म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या शाळा आता दर्जेदार होऊ लागल्या आहेत. या शाळेंमधील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण मिळावे यासाठी ई-लर्निंग सुविधा प्रत्येक शाळेला उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शाळेच्या इमारती विविध प्रकारची पुस्तके व शिक्षकांना प्रोत्साहन देऊन गुणवत्ता व दर्जा वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात शाळा दर्जेदार व्हाव्यात यासाठी शाळांना भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तालुक्यातील इयत्ता पहिली ते चौथीच्या ३४ शाळांमध्ये, इयत्ता पाचवी ते सातवीच्या ३० शाळांमध्ये तर इयत्ता ८ वी ते १० वीच्या १९ शाळांमध्ये सेमी इंग्रजी विषयाचे शिक्षण दिले जात आहे. तर अंबाजोगाई तालुक्यातील ३२ शाळांमध्ये ई-लर्निंगची सुविधा तर दहा शाळा डिजिटल झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू झाल्याने याचा फटका खाजगी शिक्षण संस्था व इंग्रजी माध्यमातील शाळांना बसू लागला आहे. जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसाठी ही अच्छे दिनांची सुरुवात आहे.