जि.प. जागांचे होणार पुनर्मूल्यांकन !
By Admin | Updated: April 11, 2017 00:10 IST2017-04-11T00:08:45+5:302017-04-11T00:10:30+5:30
लातूरजिल्हा परिषदेत भाजपाने आपली सत्ता स्थापन केल्यानंतर नवे फर्मान सोडत जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत

जि.प. जागांचे होणार पुनर्मूल्यांकन !
हरी मोकाशे लातूर
जिल्हा परिषदेत भाजपाने आपली सत्ता स्थापन केल्यानंतर नवे फर्मान सोडत जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सत्ताधारी सांगत असले तरी करार पद्धतीने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागांची माहिती त्यातून मिळवायची आहे. तसेच आजच्या दराच्या तुलनेनुसार भाडे मिळत आहे की नाही, हेही जाणून घेतले जाणार आहे. परिणामी, पुनर्मूल्यांकन होण्याबरोबर भाडे दरात वाढ होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्याची निर्मिती १९८२ साली झाली. तत्पूर्वी लातूर जिल्हा हा उस्मानाबाद जिल्ह्याअंतर्गत होता. जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत काँग्रेसची जिल्हा परिषदेवर सत्ता राहिली आहे. परंतु, यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने काँग्रेस व राष्ट्रवादीचा पराभव करून सत्ता काबीज केली आहे.
दरम्यान, सत्तेवर विराजमान होताच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे व उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी जिल्हा परिषद प्रशासनास आपल्या ताब्यातील जागा व इमारतीचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. जि.प. मालकीच्या इमारती व जागा करार पद्धतीने स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालयांना भाडे तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. वास्तविक पाहता आजपर्यंत काँग्रेसची जिल्हा परिषदेवर सत्ता राहिल्याने जिल्हा परिषदेच्या ताब्यातील इमारती व जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या संस्थांच्या ताब्यात करार पद्धतीने अल्पदरात असल्याचे जिल्हा परिषदेतील सूत्रांनी सांगितले.