जि.प. अध्यक्षपदी काँग्रेसचे महाजन

By Admin | Updated: September 22, 2014 00:56 IST2014-09-22T00:16:45+5:302014-09-22T00:56:41+5:30

औरंगाबाद : चमत्कार घडविण्याचे युतीचे दावे फोल ठरवीत काँग्रेस आघाडीने जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखली.

Zip Congress Mahajan | जि.प. अध्यक्षपदी काँग्रेसचे महाजन

जि.प. अध्यक्षपदी काँग्रेसचे महाजन

औरंगाबाद : चमत्कार घडविण्याचे युतीचे दावे फोल ठरवीत काँग्रेस आघाडीने जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखली. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने एकजुटीचे दर्शन घडवून युतीचा धुव्वा उडविला. काँग्रेसचे श्रीराम नागोराव महाजन हे अध्यक्षपदी, तर राष्ट्रवादीचे दिनकर नरसिंहराव पवार हे उपाध्यक्षपदी विजयी झाले.
शिवसेनेचे अध्यक्षपदाचे उमेदवार अनिलकुमार शांतीलाल चोरडिया व भाजपाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार इंदूमती राधाकिसन वाघ यांचा पराभव झाला. आघाडीचे महाजन व पवार यांना प्रत्येकी ३४ मते पडली तर युतीचे चोरडिया व वाघ यांना प्रत्येकी २५ मते पडली.
निवडीची प्रक्रिया सुरू असताना मंत्री अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, आ. सतीश चव्हाण, भाऊ साहेब चिकटगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, सुधाकर सोनवणे, नगरसेवक अभिजित देशमुख, इब्राहिम पटेल हे उपाध्यक्षांच्या दालनात बसून होते.
नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचे या मान्यवरांनी अभिनंदन केले. पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत महाजन यांनी मावळत्या अध्यक्षा शारदा जारवाल यांच्याकडून, तर पवार यांनी मावळत्या उपाध्यक्षा विजया चिकटगावकर यांच्याकडून पदभार स्वीकारला.
६० सदस्यांच्या या सभागृहात ५९ सदस्यांनी मतदान केले. भाजपाच्या फर्दापूर गटाच्या सदस्या भिकाबाई दगडू तडवी या अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे युतीचे मताधिक्य एका मताने घटले. काँग्रेसचे १५, राष्ट्रवादीचे ११ व मनसेच्या ८ सदस्यांनी (एकूण ३४) आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले. युतीच्या उमेदवारांना शिवसेनेचे १८, भाजपा ५ आणि २ अपक्षांनी (एकूण २५) मतदान केले.
बहुमत असूनही सिल्लोड पंचायत समिती हातून गेल्यामुळे ही निवडणूक काँग्रेस आघाडीसाठी प्रतिष्ठेची झाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आघाडीच्या सर्वच सदस्यांना गेल्या आठ दिवसांपासून बाहेर अज्ञातस्थळी पाठविण्यात आले होते. त्यानंतर युतीचे सदस्यही सहलीवर निघून गेले होते. रविवारी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता एका बसमधून युतीचे सदस्य व त्यानंतर आघाडीचे सदस्य एका लक्झरी बसमधून एकत्र आले. युतीच्या सदस्यांसोबत गजानन बारवाल, राजू दानवे आदी पदाधिकारी होते. तर आघाडीच्या सदस्यांसोबत पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड आदी मंडळी होती. तत्पूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेत येऊन उमेदवारी अर्ज भरले होते. अध्यक्षपदासाठी आघाडीकडून श्रीराम महाजन व विनोद तांबे यांनी आणि उपाध्यक्षपदासाठी रामदास पालोदकर, दिनकर पवार यांनी अर्ज नेले. परंतु अध्यक्षपदासाठी फक्त महाजन यांनीच अर्ज सादर केला. तर उपाध्यक्षपदासाठी तिघांनी अर्ज सादर केले व नंतर पालोदकर यांनी अर्ज मागे घेतला. युतीकडून दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज भरण्यात आला होता.
जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडीच्या विशेष सभेला दुपारी ३ वाजता सुरुवात झाली. हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात महाजन व पवार विजयी झाल्याची घोषणा विक्रमकुमार यांनी केली. त्यांना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी मदत केली.

Web Title: Zip Congress Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.