जिल्हा परिषद पुढाऱ्यांना अंगणवाड्या दुरूस्तीचे वावडे !
By Admin | Updated: February 8, 2015 00:10 IST2015-02-08T00:03:48+5:302015-02-08T00:10:21+5:30
उस्मानाबाद : भिंतीला तडे...उखडलेल्या फरशा...स्लॅब, पत्र्यांना गळती...शौचालयांची पडझड...खिळखिळे दरवाजे अन् खिडक्या...हे वर्णन आहे जिल्ह्यातील

जिल्हा परिषद पुढाऱ्यांना अंगणवाड्या दुरूस्तीचे वावडे !
उस्मानाबाद : भिंतीला तडे...उखडलेल्या फरशा...स्लॅब, पत्र्यांना गळती...शौचालयांची पडझड...खिळखिळे दरवाजे अन् खिडक्या...हे वर्णन आहे जिल्ह्यातील ५०६ अंगणवाड्यांचे. हे चित्र बदलण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून निधी खर्च करता येतो. परंतु, जिल्हा परिषदेतील पुढाऱ्यांना नेमक्या याच कामाचे वावडे आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने अशा अंगणवाड्यांची दुरूस्ती अपेक्षित असताना जनतेचे कैवारी म्हणविल्या जाणाऱ्या सदस्यांनी खडीकरण, मुरूमकरण, रस्ता बांधकाम अशा स्वरूपाची कामे सूचविली आहेत. त्यामुळे चिमुकल्यांना जीव मुठीत धरून नादुरूस्त अंगणवाड्यांमध्येच ज्ञानार्जन करावे लागणार आहे.
जिल्हा परिषेदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून खेडोपाडी अंगणवाड्या सुरू आहेत. एकीकडे सदरील अंगणवाड्या लोकसहभागातून ‘डिजीटल’ करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. असे असतानाच दुसरीकडे नादुरूस्त अंगणवाड्यांकडे सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या मंडळीचा कानाडोळा होताना दिसत आहे. तेराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेसाठी तब्बल अडीच ते पावणेतीन कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून अशाच स्वरूपाची कामे घेणे अपेक्षित आहे. परंतु, पदाधिकाऱ्यांनी सूचविलेल्या कामांच्या यादीवर नजर टाकली असता त्यांना केवळ रस्ता, मजबुतीकरण, खडीकरण अशा कामांमध्येच रस असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. विशेष म्हणजे जिल्हाभरातील सुमारे ५०६ अंगणवाड्यांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. यापैकी काही इमारतींच्या भिंतींना तडे गेले आहेत. काहींचे दरवाजे अन् खिडक्या खिळखिळ्या झाल्या आहेत, काही ठिकाणी फरशी उखडली आहे. तर काही अंगणवाड्यांच्या प्रसाधनगृहांची पडझड झाली आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून प्रकल्पनिहाय सदरील नादुरूस्त अंगणवाड्यांची यादी गुरूवारी झालेल्या जि. प.च्या सभेत मांडण्यात आली होती. परंतु, या विषयावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना साधी चर्चाही करावीशी वाटली नाही, हे विशेष. यामागचे इंगित काय? असा प्रश्न आता सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. या सर्व गोंधळात मात्र, दुरूस्तीचे भिजत घोंगडे कायम राहणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा नियोजन समितीतून अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी २०१४-२०१४ या आर्थिक वर्षामध्ये सुमारे ४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. आजवर ३ कोटी रूपये प्राप्त झाले असता, ही सर्व रक्कम खर्च करण्यात आली. आणखी १ कोटी रूपयांची या विभागाला प्रतीक्षा आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर ते खर्चाचे आव्हान प्रशासनासमोर असेल.
दुरूस्तीला आलेल्या अंगणवाड्यांमध्ये भूम तालुका आघाडीवर आहे. तब्बल १२८ अंगणवाड्यांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. त्यानंतर क्रमांक लागतो लोहारा तालुक्याचा. या भागात ८४ अंगणवाड्या आहेत. तसेच उस्मानाबाद ३१, कळंब ७५, परंडा ४०, वाशी २१, तुळजापूर ३४, उमरगा १९, मुरूम प्रकल्पांतर्गत २४ आणि तेर प्रकल्पातील ५० अंगणवाड्यांचा समावेश आहे. असे असतानाही याबाबतीत एकही सदस्य बोलला नाही, हे विशेष.
जिल्हाभरातील सुमारे दोनशेपेक्षा अधिक अंगणवाड्यांना पक्की इमारत नाही. त्यामुळे कुठे मंदिरात तर कुठे ग्रामपंचायतींच्या खोलीमध्ये मुलांना बसवावे लागत आहे. हा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने २०१५-२०१६ या अर्थिक वर्षामध्ये जिल्हा नियोजन समितीकडे ४ कोटींची मागणी केली आहे.