जिल्हा परिषद शाळा अतिक्रमणांच्या विळख्यात

By Admin | Updated: July 6, 2014 00:23 IST2014-07-06T00:10:04+5:302014-07-06T00:23:13+5:30

जालना : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना संरक्षक भिंतीच नसल्याने त्या त्या शाळा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्या आहेत.

Zilla Parishad identified the encroachment of the school | जिल्हा परिषद शाळा अतिक्रमणांच्या विळख्यात

जिल्हा परिषद शाळा अतिक्रमणांच्या विळख्यात

जालना : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना संरक्षक भिंतीच नसल्याने त्या त्या शाळा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्या आहेत. विशेषत: मोकाट जनावरांचा शाळांच्या आवारात मुक्तपणे वावर होत असल्याने शैक्षणिक कामकाजावरसुद्धा त्याचे परिणाम होत आहेत.
ग्रामीण भागातील या शाळांच्या अवस्थांचा लोकमतच्या चमूने शनिवारी सर्वे केला. तेव्हा बहुतांशी शाळांना संरक्षक भिंती नाही. ठिक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. काही जागांचा सर्रास खाजगी व्यक्तींकडून वापर होतो आहे. हे निदर्शनास आले. तसेच ज्या शाळांना संरक्षक भिंती आहेत, त्यांही भिंतीच्या कामात आनंदी आनंद असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. शाळांना संरक्षक भिंत बांधणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
कामात आनंदीआनंदच, अनेक शाळांकडे मोठे भूखंड
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संरक्षक भिंतींचे अलिकडील काही वर्षांत कामे दिव्यच ठरली आहेत. कारण या कामांत निव्वळ आनंदीआनंद आहे. गुणवत्तेचा पत्ताच नसल्याने या भिंती धोकदायक ठरल्या आहेत. स्थानिक पातळीवरील काही राजकीय पुढारी व तथाकथित गुत्तेदारांनी केलेल्या कामांमुळेच अशी परिस्थिती उद्भवली, हे विदारक सत्य आहे.लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून अनेक विदारक गोष्टी समोर आल्या. विशेषत: संरक्षक भिंतीचा पायाच मजबूत नसल्याचे निदर्शनास आले. भिंती निकृष्ट दर्जाच्या विटा, कमीत कमी सिमेंट व वाळूचा वापर, तसेच स्टिलचाही अभाव दिसून आला. परिणामी अनेक भिंती झुकलेल्या अवस्थेत असून, जिल्हा परिषद बांधकाम विभागातंर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांच्याच अक्षम्य दुर्लक्षामुळे अशी परिस्थिती ओढावली हे स्पष्ट आहे. जालना शहरातील जि.प.शाळेच्या मैदानावर काहींचा डोळा असल्याची चर्चा आहे. शाळेला संरक्षक भिंत नाही. मोठा भूखंड आज वाऱ्यावर आहे. जागेची मोजणी करुन संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे.
६८ शाळांना आवार भिंतींची प्रतीक्षा
दिलीप सारडा ल्ल बदनापूर
तालुक्यातील ६८ जिल्हा परिषद शाळांना आवार भिंती नसून, काही शाळांच्या जुन्या आवार भिंतीही खराब झाल्या आहेत.त्यामुळे धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत.
तालुक्यात जि.प.च्या एकूण १५६ शाळा आहेत. या शाळांचा ११ केंद्रांमधून कारभार चालतो. यापैकी ६८ शाळांना आवार भिंती नाहीत. काही शाळांना तारेचे व काटेरी कुंपन करण्यात आलेले आहे. बदनापूर येथील जवळ जवळ असणाऱ्या तीन शाळांना असलेल्या आवार भिंतीची अवस्था बिकट आहे. भिंत अनेक ठिकाणी पडली आहे.
महामार्गाकडून झुकलेल्या अवस्थेत आहे. आवार भिंतीच्या वीट बांधकामानंतर वरच्या बाजूने लावलेले लोखंडी अँगल व तार या गायब आहेत. आवार भिंतीच्या दुरवस्थेमुळे या परीसरात शाळा सुरू असताना रोडरोमिओंचा व मोकाट जनावरांचा संचार सुरू असतो.
परीक्षा काळातही विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो. शेलगाव येथील जिप शाळेलाही तीन बाजूने बांधकाम झालेले असले तरी महामार्गाच्या बाजूने आवार भिंत नाही.
स्वातंत्र्यापासून शाळा बेवारसच
कारला : जालना तालुक्यातील कारला येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा स्वातंत्र्यपूर्व काळापासून बेवारसच ठरली आहे. या शाळेत सुविधांची वाणवा आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षापणामुळे आनंदी आनंद आहे.
अद्यापही या शाळेस संरक्षक भिंत नाही. त्यामुळे शाळेत शैक्षणिक कामकाजावर त्याचा परिणाम होतो आहे. परिसरातील काही शाळांनी जिल्हा परिषदेकडे डागडुजी तसेच संरक्षक भिंतीसाठी प्रस्ताव पाठविले असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात भिंती कधी उभारणा याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसोबतच शाळेतील शिक्षकांनाही लागून आहे.
२७० शाळा संरक्षक भिंतीविना
फकीरा देशमुख ल्ल भोकरदन
या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३४० प्राथमिक व माध्यमिक शाळांपैकी २७० शाळांना संरक्षक भिंती नसल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.
या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच माध्यमिक विद्यालयांना व ७० प्राथमिक विद्यालयांना संरक्षक भिंती आहेत. परंतु २७० शाळांच्या इमारती संरक्षक भिंतीविना उभ्या आहेत. नवे भोकरदन, विरेगाव, हिसोडा, वडोदतांगड जुने, धायडी, पिंपळगाव रेणुकाई, हसनाबाद आदी गावांमधील जि.प.शाळांना संरक्षण भिंती नाहीत. याचा त्रास विद्यार्थ्यांना होतो आहे.
सरंक्षक भिंती नसल्यामुळे टवाळखोरांची गर्दी
शेषराव वायाळ ल्ल परतूर
जिल्हा परिषदेअंतर्गत १२६ शाळा आहेत. यातील बहुतांशी शाळांना संरक्षक भिंती नाही तर काही शाळांभोवती अतिक्रमणाचा विळखा पडत आहे.
परतूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, पुर्व प्राथमिक १२३ शाळा आहेत तर परतूर, आष्टी सातोना या तीन ठिकाणी जिल्हा परिषदेचे माध्यमिक विद्यालया आहेत. आष्टी, सातोना खु. या ठिकाणच्या शाळांना सरंक्षक भिंत आहे. तर परतूर येथील जिल्हा परिषद प्रशालेला मात्र संरक्षक भिंतच नाही. ही शाळा शहरातील मुख्य रस्त्यावर आहे. या शाळेच्या मैदानावर शाळा बाह्य मुलांचा तसेच टवाळखोरांचा नेहमी गोंधळ असतो. अनेकदा या मुलांमध्ये वाद होण्याचे प्रसंगही उद्भवतात. शहरातील ही शळा संरक्षक भिंतीविनाच आहे. ग्रामीण भागातील बऱ्याच शाळांना संरक्षक भिंती नाहीत.
शेवगा येथील शाळा संरक्षक दोन ठिकाणी भरते. गावातील शाळेभोवती सर्वत्र वसाहती झाल्या आहेत. खिचडी शिजविण्यासाठीही जागा नाही. मुलांना खेळाचे मैदानही नाही.
आष्टी येथील शाळेभावेती अतिक्रमण वाढत आहे. वरफळ येथील शाळेला संरक्षक भिंती नसल्याने सतत वाटसरूची येजा असते. राणी, वाहेगाव येथील शाळांना संरक्षक भिंत नाही. परतूर तालुक्यातील वर्गातील २० गाव निम्न दुधना प्रकल्पात गेली आहेत. या गावांचे पुनर्वसन झाले या पुनर्वसित गावांत संरक्षक भिंती मैदान तर सोडाच येथील शाळांची मोठी दुरवस्था झाला आहे.
जाफराबाद तालुक्यात ९६ शाळांना आडोसा
प्रकाश मिरगे ल्ल जाफ्राबाद
जाफराबाद तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या इमारती संरक्षक भिंती विनाच चालत असून त्या शाळेच्या भिंतीदेखील मोडकळीस आल्या आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेसह १४६ शाळा सुरू असून त्यापैकी ९६ शाळांचे संरक्षक भिंतीचे कामे झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेले आहे. ५० शाळांचे संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्याचबरोबर शाळेच्या आहे त्या इमारतीदेखील मोडकळीस आल्या आहेत.
शाळेच्या भोवती असलेल्या जागेवर संरक्षक भिंतीअभावी परिसरात अतिक्रमण होत आहे. प्राथमिक शाळेच्या इमारती सार्वजनिक ठिकाणी आहेत. ज्ञानदानाच्या कामात अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊन पालक वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. जाफराबाद, माहोरा, खासगाव येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा तर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. प्रवेशद्वाराचीच मोठी समस्या आहे. शाळा परिसर लगत तर अवैध व्यवसाय देखिल सुरू आहे. याचा परिणाम विद्यार्थी संख्येवर होत आहे. प्राथमिक शिक्षक यांच्याकडे असलेले कामे, तसेच मुख्यालयी हजर राहत नसल्याने खेड्यातील विद्यार्थी आता प्राथमिक व इंग्रजी माध्यमांचे शिक्षण घेण्यासाठी शहराच्या ठिकाणी येत आहेत.
शिक्षणासाठी सुशिक्षित पालक आपल्या पाल्याला सर्व सुविधा असलेल्या शाळेत पाठवित आहेत. आर्थिक मागास कुटूंबातील विद्यार्थी मात्र चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
यासाठी शाळा परिसरातील मूलभूत सोयी सुविधांचा अभाव तर आहेच. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या समन्वयातून चांगले शिक्षण भैतिक सुविधेसह कसे मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अंबड तालुक्यात १६० शाळा कुंपनाविना
रवि गात ल्ल अंबड
तालुक्यातील १६० जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षक भिंत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २०८ प्राथमिक तर ५ माध्यमिक शाळा मिळून एकूण २१३ शाळा आहेत. यापैकी फक्त ५३ शाळांना पक्की संरक्षक भिंत आहे. १६० शाळांना काटेरी झुडपे अथवा तात्पुरते काटेरी कुंपन केल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
संरक्षक भिंत नसल्याने मोकाट जनावरांच्या उपद्रवासोबत गावातील काही टवाळखोर मंडळींचाही विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. काहीवेळा शिक्षकांनाही या त्रासाला सामोरे जावे लागते. काही शाळा परिसरात अतिक्रमणदेखील वाढले आहे. यामुळे शाळा प्रशासन व ग्रामस्थांत अनेकदा वादही झालेले आहेत. अनेक शाळांच्या इमारती जिर्ण अवस्थेत आहेत. शाळांना संरक्षक भिंत बांधून मिळावी यासाठी काही शाळांना जिल्हा परिषदेकडे प्रस्तावही तयार केल्याचे सांगण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Zilla Parishad identified the encroachment of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.