झिंगणाऱ्यांना ना ‘हृदया’ची काळजी, ना ‘विंचवाचा’ डंख

By Admin | Updated: July 29, 2014 01:09 IST2014-07-29T00:20:06+5:302014-07-29T01:09:06+5:30

उस्मानाबाद : दारू आणि तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची शासनासह विविध सामाजिक संघटनांकडून जनजागृती करण्यात येत आहे़

Zhingara does not care for 'heart', nor 'scarring' stings | झिंगणाऱ्यांना ना ‘हृदया’ची काळजी, ना ‘विंचवाचा’ डंख

झिंगणाऱ्यांना ना ‘हृदया’ची काळजी, ना ‘विंचवाचा’ डंख

उस्मानाबाद : दारू आणि तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची शासनासह विविध सामाजिक संघटनांकडून जनजागृती करण्यात येत आहे़ असे असले तरी युवक, मजुरांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असून, त्यांना ना ‘ह्दया’ची काळजी ना ‘विंचवा’च्या डंखाची तमा आहे़
शेतात कामाला जाणारा मजूर असो अथवा महाविद्यालयीन शिक्षण घेणारे युवक असोत किंवा शासकीय, निमशासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी, कर्मचारी असोत यात अनेकांना दारूसह तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात जडले आहे़ शहरातच नव्हे ग्रामीण भागाच्या गल्लीबोळात, चौकाचौकात मोठ्या प्रमाणात पानटपऱ्यांसह दारूची दुकाने थाटण्यात आली आहेत़ हातभट्टी, गावठी दारू सहजपणे उपलब्ध होत आहे़ पोलिसी कारवाईचीही सवय लागलेल्यांना याची कोणतीच तमा राहिलेली नाही़ शाळा महाविद्यालयाच्या आवारातील १०० मीटरवर पानटपरीसह इतर तंबाखू, आम्लीपदार्थ विक्री करण्यास मनाई आहे़ मात्र, तरीही या परिसरात नव्हे शाळा-महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्येच सिगारेटांचे धूर सुटू लागले आहेत़ या धुराचा सिगारेट ओढणाऱ्याला त्रास होतोच, शिवाय निर्व्यसनी युवकांनाही याचा त्रास होत असल्याचे दिसून येते़ शिवाय अनेक शिक्षकांनाही सिगारेटसह सुपारीचा छंद असल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई होणार कशी ? असा प्रश्न आहे़ तंबाखू, सिगारेटसह दारूच्या बाटल्यांवरही होणाऱ्या दुष्परिणामांच्या सूचना दिलेल्या आहेत़ तंबाखूवर विंचवाचे चित्र दाखवून तंबाखू खाणे शरीरासाठी विषाप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे़ मात्र, तरीही आम्लीपदार्थांचे सेवन राजरोस सुरू असल्याचे भीषण चित्र समाजात आहे़
तंबाखूचे दुष्परिणाम
तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेटमुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, किडनीचा किंवा मूत्राशयाचा कॅन्सर (कर्करोग) होवू शकतो़ ५६़४ टक्के स्त्रियांना व ४४़९ टक्के पुरूषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे समोर आले आहे़ ९० टक्क्यांपेक्षा अधिक फुफ्फुसाचा आणि इतर कॅन्सर हा धुम्रपानामुळे होत असल्याचा निष्कर्ष आहे़
मानसिक स्वास्थ्य बिघडते
दारूसह इतर आम्ली पदार्थामुळे संबंधितांचे मानसिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात बिघडून जाते़ दारूमुळे मेंदूवरील नियंत्रण सुटल्याने गुन्हेगारी कृत्यासह समाजविघातक कृत्यही संबंधितांच्या हातून घडू शकते़ शिवाय संशयी वृत्ती, नैराश्य वाढल्याने कुटुंबातही कलह निर्माण होतात, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ महेश कानडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
वर्षभरात केला सात लाखांचा मुद्देमाल जप्त
येथील अन्न व सुरक्षा विभागाचे आयुक्त पारधी, अन्न सुरक्षा अधिकारी लोंढे, एऩटी़मुजावर यांच्या पथकाने एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत जिल्ह्यात ठिकठिकाणी गुटखा विक्रेत्यांसह तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरूध्द कारवाई करून तब्बल ५ लाख, ४ हजार ५९१ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़ तर चालू वर्षी जुलै अखेरपर्यंत केलेल्या विविध कारवाईत एक लाख, ९३ हजार ६७१ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होऊनही अवैधरीत्या गुटखाविक्री जोमात सुरू आहे़
दारूचे दुष्परिणाम
दारूमुळे जठरात दहा व सूज येणे, यकृतावर दुष्परिणाम झाल्याने भूक मंदावणे, अशक्तपणा येणे, कावीळ, पोटात पाणी, स्वादुपिंडाला आजार, स्नायूंचा कमकुवतपणा, मेंदी आणि ह्दयावरील वाईट परिणाम आदीमुळे दुष्परिणाम होतात़ अतिदारू प्राशनामुळे बेशुध्द झालेल्यांचा मृत्यूही होऊ शकतो़ शिवाय याचे सामाजिक परिणामही मोठे होतात़ दारू पिणाऱ्या पुरूषांसह महिलांनाही वरील अजार जडतात़
सामाजिक दुष्परिणाम
दारू पिऊन रस्त्याने झिंगणारे ठिकठिकाणी दिसून येतात़ त्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबाची सामाजिक, आर्थिक हानी मोठी होते़ शिवाय भांडण-तंटेही मोठ्या प्रमाणात उद्भवतात, समाजातही तेढ निर्माण होण्याचा धोका संभवतो़ अनेकांचे संसार दारूमुळे उध्दवस्त झाल्याची हजारो उदाहरणे समाजासमोर आहेत़
सामाजिक प्रयत्न गरजेचे
अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्यांसह दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस प्रशासन कारवाई करते़ यापुढेही पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे़ मात्र, हा प्रश्न सहजासहजी मिटणारा नाही, त्या व्यक्तींमध्ये निर्माण झालेला वाईट गुण काढण्यासाठी सामाजिक प्रयत्न गरजेचे आहेत़ देशाचे भविष्य असलेली युवापिढीही व्यसनाच्या आहारी जात आहे़ त्यामुळे पालकांसह त्या व्यक्तीच्या कुटुंबातील प्रत्येकाने त्याचे व्यसन सुटण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले़

Web Title: Zhingara does not care for 'heart', nor 'scarring' stings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.