युवक महोत्सवाला आजपासून प्रारंभ
By Admin | Updated: December 13, 2014 00:30 IST2014-12-13T00:25:18+5:302014-12-13T00:30:03+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्यापासून केंद्रीय युवक महोत्सवाला प्रारंभ होत आहे.

युवक महोत्सवाला आजपासून प्रारंभ
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्यापासून केंद्रीय युवक महोत्सवाला प्रारंभ होत आहे. ‘नटरंग’फेम सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
सोनेरी महल परिसरात उभारण्यात आलेल्या मुख्य रंगमंचावर हा समारंभ होईल. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने युवक महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून जवळपास २२५ महाविद्यालयांचे संघ या महोत्सवात सहभागी होणार आहेत. १३ ते १६ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात संगीत, नृत्य, नाटक, ललित कला, वाङ्मय व लोककला अशा एकूण ३५ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील काही वर्षांपासून बंद करण्यात आलेला ‘लावणी’ हा नृत्याविष्कार यंदा महोत्सवाचे आकर्षण राहणार आहे.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले की, या महोत्सवानिमित्त १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यापीठ’ ही संकल्पना घेऊन विद्यापीठाच्या ‘अॅथलेटिक्स’ क्रीडा मैदानावर १० हजार दिव्यांचा दीपोत्सव साकारला जाणार आहे.
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे पारितोषिक वितरण प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
मंगळवारी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास तसेच उद्याच्या उद्घाटन समारंभास कुलसचिव डॉ. धनराज माने, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. चेतना सोनकांबळे, विद्यार्थी संसद अध्यक्ष लखनलाल भुरेवाल, सचिव माधुरी मिरकर, विद्यापीठ विभाग सचिव नामदेव कचरे यांची प्रमुख उपस्थिती राहील.