विद्यापीठात ‘सृजन’चे धुमशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:52 IST2017-10-25T00:52:03+5:302017-10-25T00:52:34+5:30
येत्या रविवारपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘सृजन २०१७’ या केंद्रीय युवक महोत्सवास सुरुवात होत असून, यामध्ये आतापर्यंत १८० महाविद्यालयांतील सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि अडीचशेपेक्षा जास्त संघप्रमुख सहभागी होणार आहेत.

विद्यापीठात ‘सृजन’चे धुमशान
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : येत्या रविवारपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘सृजन २०१७’ या केंद्रीय युवक महोत्सवास सुरुवात होत असून, यामध्ये आतापर्यंत १८० महाविद्यालयांतील सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि अडीचशेपेक्षा जास्त संघप्रमुख सहभागी होणार आहेत. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध १५ प्रमुख समित्या आणि ६० विद्यार्थी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांनी मंगळवारी (दि.२४) पत्रकार परिषदेत दिली.
२९ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान होणा-या या महोत्सवाचे रविवारी सकाळी ११ वाजता अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते नृत्य विभागाच्या खुल्या मंचावर उद्घाटन आणि येथेच १ नोव्हेंबर रोजी अभिनेता संदीप पाठक यांच्या हस्ते बक्षीस वितरण व समारोप होणार आहे. ‘बक्षीस स्वीकारताना विद्यार्थी जल्लोष करतात. बंद सभागृहात अशा प्रकारचा जल्लोष करण्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यंदा खुल्या मंचावर उद्घाटन व समारोप सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला, असे डॉ. खान म्हणाले.
महोत्सवातील विविध स्पर्धांसाठी विद्यापीठातील सात मंच सज्ज करण्यात आले आहेत. त्यांना सृजनरंग, लोकरंग, नाट्यरंग, नटरंग, ललितरंग, शब्दरंग आणि नादरंग अशी नावे देण्यात आली आहेत. विजेत्यांच्या निवडीसाठी एकूण ५७ परीक्षकांची निवड करण्यात आली असून, ते सर्व औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यांबाहेरील आहेत. सर्व स्पर्धक व संघ प्रमुखांची विद्यापीठ परिसरातील वसतिगृहांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात येणार असून, बास्केटबॉल कोर्टवर जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.