उद्योगनगरीत अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:03 IST2021-02-18T04:03:41+5:302021-02-18T04:03:41+5:30

वाळूज महानगर : उद्योगनगरीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बुधवारी ...

Young girl beaten up in industrial city | उद्योगनगरीत अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण

उद्योगनगरीत अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण

वाळूज महानगर : उद्योगनगरीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले आहे.

वाळूज एमआयडीसी परिसरातील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी मंगळवार (दि.१६) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उद्योगनगरीतून पायी घरी चालली होती. या अल्पवयीन मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या अजय मधुकर चव्हाण (२२) याने तिला रस्त्यात अडवून तू माझ्याशी का बोलत नाही, असे म्हणून तिचा हात धरत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. योगायोगाने या मुलीचे वडील तिच्या पाठीमागून येत असताना हा प्रकार दिसताच त्यांनी अजयच्या तावडीतून मुलीची सुटका करीत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या अजयने तिच्या वडिलांना ‘तुम्ही मध्ये येऊ नका. नसता तुम्हाला मारून टाकीन’ अशी धमकी दिली.

भररस्त्यावर हा प्रकार सुरू असल्याने लगतच्या कंपन्यांतील सुरक्षारक्षक व कामगारांनी घटनास्थळ गाठून आरोपीच्या तावडीतून तिची सुुटका केली. यापूर्वीही आरोपीने त्या अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून तिला मारहाण करीत तिची छेड काढली आहे. सततच्या त्रासाला कंटाळून बुधवारी पीडित अल्पवयीन मुलीने वडिलांना सोबत घेऊन तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास जेरबंद केले. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक सचिन पागोटे करीत आहेत.

Web Title: Young girl beaten up in industrial city