दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुण डॉक्टर अत्यवस्थ
By Admin | Updated: June 27, 2016 01:04 IST2016-06-27T00:37:34+5:302016-06-27T01:04:34+5:30
औरंगाबाद : मोबाईलवर बोलत असताना वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील इंटर्नशिप (आंतरवासित) करणारा डॉक्टर गंभीर जखमी झाला.

दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुण डॉक्टर अत्यवस्थ
औरंगाबाद : मोबाईलवर बोलत असताना वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील इंटर्नशिप (आंतरवासित) करणारा डॉक्टर गंभीर जखमी झाला. मध्यरात्री घडलेल्या या घटनेची माहिती रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर त्यास बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले आहे.
डॉ. देवेंद्र विठोबा बावस्कर (२४, रा. बुलडाणा) असे जखमी डॉक्टरचे नाव आहे. देवेंद्र यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यावर घाटी रुग्णालयात त्यांची इंटर्नशिप सुरू आहे. ते महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहात रूम पार्टनर डॉ.अगंतुक कनव्हर यांच्यासोबत राहतात. शनिवारी मध्यरात्री ते मोबाईलवर बोलण्यासाठी वसतिगृहाच्या गच्चीवर गेले असताना खाली पडले.
रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सकाळी अगंतुक आणि अन्य विद्यार्थी गच्चीवर गेले त्यावेळी त्यांना वसतिगृहाच्या मागील बाजूस डॉ. देवेंद्र खाली पडलेले दिसले. त्यानंतर डॉ. विनोद मोहरे आणि अन्य विद्यार्थ्यांनी त्यांना बेशुद्धावस्थेत अपघात विभागात दाखल केले. तपासणीत त्यांच्या मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे आढळले. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर यांनी दिली. या घटनेचा तपास बेगमपुरा पोलिसांनी सुरू केला आहे.