होय, शहराला एक दिवसाआड पाणी पुरविता येणे शक्य: जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:02 IST2021-05-04T04:02:16+5:302021-05-04T04:02:16+5:30
यासाठी महापालिकेच्या इच्छाशक्तीची गरज असून, ती नसल्यामुळे व सात ते आठ दिवसांनंतरही आलेल्या पाण्याने दिलेल्या वेदना सहन करण्याची शक्ती ...

होय, शहराला एक दिवसाआड पाणी पुरविता येणे शक्य: जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांचा दावा
यासाठी महापालिकेच्या इच्छाशक्तीची गरज असून, ती नसल्यामुळे व सात ते आठ दिवसांनंतरही आलेल्या पाण्याने दिलेल्या वेदना सहन करण्याची शक्ती औरंगाबादकरांमध्ये आहे, हे ओळखून महापालिका पाणी पुरवठ्याच्या नियोजनात काही करताना दिसत नाही. हे आश्चर्यकारक होय, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून नागरे यांनी म्हटले की, ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी औरंगाबादकरांची वर्षानुवर्षांची अवस्था आहे. हे शहर स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट असल्यामुळे पाण्यासारखी अत्यावश्यक गरज समाधानकारकरितीने पूर्ण होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली तर ती चुकीची ठरू नये.
पुणे हे शहर गरजेपेक्षा दीडपट पाणी वापरणारे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. तेथील महापालिकेने व लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून हे शक्य करून दाखवले आहे. दुसरीकडे औरंगाबादजवळच जायकवाडी धरण असतानाही औरंगाबादकरांना ३६५ दिवसातून फक्त ५५ ते ६० दिवस पाणी मिळते व दुसरीकडे ४०५० रुपये पाणीपट्टी मात्र सक्तीने वसूल केली जाते.
औरंगाबाद शहराला जायकवाडीतून प्रतिदिनी १२० दशलक्ष लीटर पाणी मिळते. औरंगाबादची लोकसंख्या १६ लाख आहे. प्रतिव्यक्ती १३५ लीटर पाणी प्रतिदिन घरगुती वापरासाठी मिळणे आवश्यक आहे. म्हणजे शहराची गरज २१६ दशलक्ष लीटर इतकी आहे. एक दिवसाआड पाणी देण्याचे मान्य केले तर महापालिकेला प्रतिदिन १०८ एमएलडी पाणी लागेल. म्हणजे पहिल्या दिवशी अर्धी लोकसंख्या असलेल्या भागात मनपा ११० एमएलडी साठ्यातून १०८ एमएलडी पाणी सहज पुरवू शकेल. उर्वरित अर्ध्या लोकसंख्येला दुसऱ्या दिवशी १०८ एमएलडी पाणी पुरविता येऊ शकेल. महापालिकेला एक दिवसआड पाणी पुरवणे अशक्य नाही. मात्र, यासाठी महापालिकेने जलकुंभाचे नियोजन करण्यावर भर देण्याची आवश्यकता नागरे यांनी व्यक्त केली आहे.