पिवळ्या पाण्याची शिक्षा !

By Admin | Updated: April 16, 2017 23:20 IST2017-04-16T23:13:59+5:302017-04-16T23:20:28+5:30

कळंब : शहराला मागील महिनाभरापासून न.प.द्वारे पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

Yellow water education! | पिवळ्या पाण्याची शिक्षा !

पिवळ्या पाण्याची शिक्षा !

कळंब : शहराला मागील महिनाभरापासून न.प.द्वारे पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जलशुद्धीकरण यंत्रणेत बिघाड झाल्याने धरणातील पाणी थेट नळाद्वारे जसेच्या तसे येत आहे. याकडे न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरवासीय मात्र महिनाभरापासून पिवळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहे.
कळंब शहर व डिकसळ या गावातील जवळपास ४० हजार नागरिकांना कळंब पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो आहे. सध्या शहरातील विविध भागात न.प. तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा करते. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना नळाद्वारे पिवळे पाणी मिळत आहे. शहरातील सर्वच भागात हीच परिस्थिती आढळून येत असल्याने शहरात हा चर्चेचा विषय झाला आहे. न.प. प्रशासन दरवर्षी पाण्याच्या शुद्धीकरणावर लाखो रुपये खर्च करते. तुरटी, पावडर आदी वस्तूंची नियमितपणे व प्राधान्याने खरेदी केली जाते. मागील सत्ताधारी मंडळींनी जाता-जाता लाखो रुपये खर्चून या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळही काढला होता. प्रशासनाकडे पाणी शुद्धीकरण करण्याच्या वस्तूंची कमतरता नसतानाही शहरवासीयांच्या नशिबी पिवळे पाणी कशामुळे? असा संतप्त सवालही नागरिकांमधून विचारला जात आहे.
न.प.ने नुकतीच ‘मार्च एण्ड’च्या नावाखाली जवळपास ८० टक्के पाणीपट्टी वसूल केली आहे. ज्यांनी पाणीपट्टी वा इतर कर भरला नाही अशा ‘टॉप टेन’ थकबाकीदारांचे डिजिटल बॅनर शहरात झळकावून त्यांचा उद्धार केला; मग पाणीपट्टी भरूनही अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या न.प. प्रशासनाचा कसा निषेध व्यक्त करावा, अशी प्रतिक्रियाही शहरवासीयांमधून व्यक्त केली जात आहे. याबाबत न.प. प्रशासन मात्र स्पष्टपणे काहीही सांगत नाही. धरणातून पाणी ढवळून येत असल्याने ते पूर्ण क्षमतेने शुद्ध होत नसल्याचे न.प.चे म्हणणे आहे; मात्र हा प्रकार महिनाभरापासून सुरू असताना यावर न.प. प्रशासन काहीच उपाययोजना करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा आहे. मग गढूळ पाणी येण्याचा संबंध काय? पाणी ढवळून येत असेल व ते शुद्धच होत नसेल तर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणाची वाट बघितली जात आहे, हा प्रश्नही आता सर्वसामान्यांमधून विचारला जाऊ लागल्याने आगामी काळात पिवळे पाणी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे(वार्ताहर)

Web Title: Yellow water education!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.