येलदरीत वृक्षलागवड
By Admin | Updated: July 26, 2014 00:32 IST2014-07-25T23:38:43+5:302014-07-26T00:32:30+5:30
प्रशांत मुळी, येलदरी येलदरी धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावा, या हेतूने या भागात साडेतीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वन विभागाने ही वृक्षलागवड केली.
येलदरीत वृक्षलागवड
प्रशांत मुळी, येलदरी
येलदरी धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावा, या हेतूने या भागात साडेतीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने ही वृक्षलागवड केली.
जिल्ह्यातील येलदरी धरण पर्यटंकासाठी एक चांगले ठिकाण म्हणून नावारूपास आले आहे़ दरवर्षी येथे राज्यासह परराज्यांतून पर्यटक जलविद्युत केंद्रासह धरण पाहण्यासाठी येतात. पूर्वी याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी होती़ मात्र कालांतराने ही झाडे तोडल्याने हा परिसर उजाड झाला़
तत्कालीन जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांनी देखील या परिसरात झाडे लावण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही़ काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी एस़पी़ सिंह यांनी येलदरीचा दौरा केला होता़ त्यावेळी त्यांनी येथील या भागात झाडे लावण्यास वाव असल्याचे म्हटले होत़े़ त्यादृष्टीने येलदरी धरण परिसरात झाडे लावण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे ठेवण्यात येऊन सदरील जागा वनविभागाला झाडे लावून सुशोभीकरण करण्यासाठी ताब्यात देण्यात आली आहे़
जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता मोजमील, उपविभागीय अधिकारी खंदारे, शाखाअधिकारी ़सुधाकर जोशी, वनविभागाचे हनुमंत वाळके, उपवनसरंक्षक राठोड, वनपाल मो़ हश्मी, वनरक्षक गणेश घुगे, सुभाष पितळे, प्रकाश राठोड यांच्या प्रयत्नातून परिसर सुशोभित होत असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे़
सिंह यांनी केली होती पाहणी
जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी येलदरी येथे भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी बोटींग करून परिसराची पाहणीही केली होती. त्याच वेळी त्यांनी झाडे लावण्याची सूचना केली होती.
विविध जातींची झाडे
आंबा, चिंच, आवळा, सिताफळ, सिसम, वड, पिंपळ, लिंब, अशोक आदीसंह विविध जातीचे झाडे याठिकाणी लावली आहेत़ यामुळे आगामी काळात हा परिसर सुशोभित होणार आहे.
निधी मिळाल्यास पर्यटन विकास शक्य
येलदरी धरणाच्या मधोमध मोठी टेकडी आहे. या टेकडीचा विकास केल्यास पर्यटनाला या ठिकाणी चालना मिळू शकते. परंतु पुरेसा निधी नसल्याने या टेकडीचा विकास झालेला नाही. शिवाय धरणामध्ये बोटींग व्यवसाय देखील वाढू शकतो. त्यामुळे जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी जलाशयाच्या मधोमध असलेल्या टेकडीवरील प्रस्तावीत पर्यटनस्थळाला मान्यता द्यावी व पर्यटनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़