खंडोबा मंदिरात भंडारा उधळत ‘येळकोट येळकोट’चा गजर
By Admin | Updated: December 17, 2015 00:10 IST2015-12-16T23:55:28+5:302015-12-17T00:10:37+5:30
औरंगाबाद : सातारा खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

खंडोबा मंदिरात भंडारा उधळत ‘येळकोट येळकोट’चा गजर
औरंगाबाद : सातारा खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर आवारात ‘वाघ्या-मुरळी’चा डफ अन् तुणतुण्याची तार छेडत जागर, गोंधळ भंडारा उधळीत ‘सदानंदाचा येळकोट येळकोट’चा गजर दुमदुमणार आहे.
ट्रस्टीसह पोलिसांनीही आधार कार्ड व मतदार कार्ड असल्याशिवाय मंदिरात ‘जागर-गोंधळ’ घालता येणार नाही, असा पवित्रा घेतल्याने वाघ्या मंडळींनी आधार कार्डची प्रत सादर करून मंदिराकडे नोंदणी केली आहे. परिसरात देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची नजर गतवर्षीपासूनच आहे, तर पुरातत्व विभागाचा एक सुरक्षारक्षकही दीपमाळ व मंदिर आवारात पहारा देत आहे.
पोलिसांचा पहारा कडक : पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले की, सहायक पोलीस आयुक्त रविकांत बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन पोलीस निरीक्षक, २० फौजदार, १५० पोलीस कर्मचारी व महिला पोलीस वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय मंदिराचे स्वयंसेवक कार्यरत आहेत.
आरती : आरतीला सकाळी ७ वाजता खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, आ. अतुल सावे, आ. सुभाष झांबड, महापौर त्र्यंबक तुपे, राजेंद्र जबिंदा, प्रमोद खैरनार, अंबादास दानवे, गणेश चोपडे, अरविंद देशपांडे, अनिल आग्रारकर, अमित खंडारे, राजू नरवडे, वॉर्ड अधिकारी सी.एम. अभंग आदींची उपस्थिती राहणार आहे, असे सातारा खंडोबा मंदिर ट्रस्टच्या वतीने गोविंद चोपडे, मोहन पवार, साहेबराव पळसकर, विठ्ठल देवकर आदींसह पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
लघुरुद्राभिषेक : सकाळी ७ वाजता आरती, छबिना मिरवणूक व खंडोबाची मूळ मूर्ती जहागीरदारांच्या वाड्यात दाखल होणार असून, लघुरुद्राभिषेक आणि परत मिरवणुकीने रात्री ८.३० वाजता मंदिरात मूळ स्थानी स्थापन होेईल.