वाय.एस. खेडकर शाळेचा मनमानी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:46 IST2018-06-19T00:46:43+5:302018-06-19T00:46:54+5:30
सिडकोतील डॉ. वाय. एस. खेडकर शाळेत शासकीय नियमांची पायमल्ली करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालातून समोर आली. यावरून प्राथमिकच्या शिक्षणाधिका-यांनी मान्यता रद्द करण्यासाठी शाळेला नोटीस पाठविली आहे.

वाय.एस. खेडकर शाळेचा मनमानी कारभार
राम शिनगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिडकोतील डॉ. वाय. एस. खेडकर शाळेत शासकीय नियमांची पायमल्ली करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालातून समोर आली. यावरून प्राथमिकच्या शिक्षणाधिका-यांनी मान्यता रद्द करण्यासाठी शाळेला नोटीस पाठविली आहे. याच वेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या २०० पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापक, पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांचा छळ केल्याचा आरोप करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शाळा प्रशासनानेही पालकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
सिडको परिसरातील डॉ. वाय. एस. खेडकर शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी एकत्र येऊन प्राथमिक शिक्षणाधिका-यांकडे निवेदन दिले होते. यावरून शिक्षणाधिका-यांनी गटशिक्षणाधिका-यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीच्या अहवालात शाळेच्या गैरकारभाराची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. शाळेत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ चा भंग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय पालक शिक्षण संघाची समिती स्थापन न करणे, शुल्कवाढीस विभागीय उपसंचालकांची मान्यता न घेणे, शाळा प्रशासनाने पालकांनी अभ्यासक्रमांची पुस्तके, वह्या व शालेय गणवेश शाळेमधून घेणे सक्तीचे करणे, शाळेच्या खानावळीतील जेवण पालकांना न विचारता सक्तीचे करणे, पहिली ते पाचवीसाठी शासनाच्या नियमावलीनुसार डी.टी.एड. अर्हताकारी शिक्षणकांची नेमणूक न करणे, असे विविध प्रकारचे गैरप्रकार शाळेत सुरू असल्याचे ताशेरे चौकशी अहवालात नोंदविण्यात आले. यानुसार प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांनी आरटीई अधिनियम आणि महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमातील तरतुदींचा भंग केल्यामुळे शाळेची मान्यता रद्द करण्याची नोटीस दहा दिवसांपूर्वी शाळेच्या अध्यक्ष, सचिवांना पाठविली. या नोटिसीनंतरही शाळा प्रशासनाने मनमानी कारभार थांबविलेला नसल्याचा आरोप पालकांनी केला. तसेच पालक पाल्यांना शाळेत धमकावण्यात येऊ नये, अशी विनंती करण्यासाठी गेले असता, त्यांच्यावरच पोलिसात गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही पालकांनी केला. शाळेला राजकीय पाठबळ असून, शाळेचे कोणी काहीही वाकडे करू शकत नाही.
शाळेने मनमानी पद्धतीने ठरवलेली फीस, खानावळीतील जेवण, गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक केले आहे. हे घ्यायचे नसेल तर त्या वस्तूंसाठी लागणारे शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोपही पालकांनी सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे. या पालकांच्या विरोधातही शाळा प्रशासनाने सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.