चालू कामावरील मजुरांची हजेरीपत्रकावर नोंदच होईना !
By Admin | Updated: June 30, 2014 00:41 IST2014-06-30T00:23:00+5:302014-06-30T00:41:30+5:30
कळंब : एकीकडे तालुक्यात मग्रारोहयोची कामे चालू नसतानाही कामे चालू दाखविण्याची धडपड प्रशासन करीत असताना जवळा (खु) येथील मग्रारोहयो कामावरील मजुरांची मात्र हजेरीपत्रकावर नोंदच होत
चालू कामावरील मजुरांची हजेरीपत्रकावर नोंदच होईना !
कळंब : एकीकडे तालुक्यात मग्रारोहयोची कामे चालू नसतानाही कामे चालू दाखविण्याची धडपड प्रशासन करीत असताना जवळा (खु) येथील मग्रारोहयो कामावरील मजुरांची मात्र हजेरीपत्रकावर नोंदच होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कळंब तालुक्यातील जवळा (खु) येथे ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राष्ट्रीय मार्ग १५९ ते जवळा (खु) या रस्त्याच्या बाजुपट्ट्याच्या मजबुतीकरणाचे काम मंजूर आहे. या कामाच्या माध्यमातून जवळपास ३० मजुरांना येथे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. हे काम चालू करावे, यासाठी या भागातील मजूर मागील काही महिन्यांपासून काम मागणीचा अर्ज भरुन घेण्याची विनंती संबंधित ग्रामरोजगार सेवक तसेच जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाकडे करीत आहेत. मात्र ही मागणीच संबंधितांकडून तहसील प्रशासनाकडे केली जात नसल्याने हे कामच चालू होऊ शकले नाही. परिणामी या भागातील २० ते २२ मजुरांना उपासमार सहन करावी लागत आहे. त्यामुळेच जवळा (खु) येथील २० ते २२ मजुरांनी तहसीलदारांना निवेदन देवून हे काम सुरु केले आहे. परंतु, या मजुरांची हजेरीपत्रकावर नोंद नसल्याची बाब समोर आली आहे. यावर तहसील प्रशासन काय भूमिका घेते? हे पाहणे उत्सुकतेचे आहे. (वार्ताहर)
प्रशासनाची चालढकल
विशेष म्हणजे जेथे कामे चालू असल्याचा अहवाल तहसील प्रशासनाने कागदोपत्री दाखविला होता. तेथे मजुरांची उपस्थिती नगण्य असल्याचे काही दिवसापूर्वीच उघड झाले होते. जवळा (खु) येथे खुद्द मजुरांकडूनच मागणी होत असताना प्रशासन मात्र चालढकल करीत असल्याचे दिसत आहे.