कामगारांनो तुमच्या पाल्याला शिष्यवृत्ती मिळते का? काय आहे पात्रता ? वेळ काढा, जाणून घ्या
By साहेबराव हिवराळे | Updated: December 4, 2023 14:03 IST2023-12-04T14:02:49+5:302023-12-04T14:03:17+5:30
पगारात कामगार कल्याण निधी कपात झाला काय?

कामगारांनो तुमच्या पाल्याला शिष्यवृत्ती मिळते का? काय आहे पात्रता ? वेळ काढा, जाणून घ्या
वाळूज महानगर : माहे जृून व डिसेंबरच्या पगारातून रु. १२ इतका कामगार कल्याण निधी कपात होणाऱ्या कामगारांच्या कुटुंबातील मुलांना शैक्षणिक पात्रता शिष्यवृत्ती योजना लाभार्थी होता येते. हे तुम्हाला माहीत होते का? नसेल तर करा अर्ज व फायदा घ्याच.
कोण आहे याला पात्र..?
आपण नोकरी करता का? मग हे तुमच्यासाठी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शासनाने कल्याणकारी उपक्रम सुरू केलेला आहे; परंतु. ९० टक्के कामगाराला या कल्याणकारी योजनेचा लाभ घेता आलेला नाही. कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची माहिती विशेषत: प्रशासनाने संस्थेने कामगाराला दिली पाहिजे. याविषयी कामगार संघटना फक्त कामगारांच्या पगारवाढ व अग्रिमेंट या दोन प्रकरणांमध्ये झगडत असतात. शासनाच्या उपक्रमाची माहिती दिली जात नाही.
हे घेऊ शकता लाभ...
साखर कारखाना, खासगी कंपनी, सूतगिरणी, लहान-मोठे कारखाने, सर्व बँका, इन्शुरन्सची कंपनी, शाॅपिंग माॅल्स, वाहतूक कंपन्या, एस. टी. महामंडळ, वीज कंपनी, वीज वितरण कंपनी, बीएसएनएल, माथाडी कामगार, सिक्युरिटी एजन्सी, एमटीएनएल, दूध संघ, कापूस पणन महासंघ, गव्हर्नमेंट प्रेस, सर्व दवाखाने, कृषी उद्योग महामंडळ, सर्व वृत्तपत्रे, कुरिअर सर्विसेस, प्राथमिक शिक्षक बँक, किंवा फॅक्टरी ॲक्ट अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, बॉम्बे शाॅप ॲक्ट अंतर्गत सर्व दुकाने, द मोटर ट्रान्सपोर्ट ॲक्ट अंतर्गत नोंदीत आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही योजना दरवर्षी चालवते.
याकडे लक्ष द्यावे
-फक्त कामगारांच्या पाल्यांसाठी (मुले व पत्नी) योजना आहे.
-अर्ज करण्यास मागील वर्षीच्या परीक्षेत कमीतकमी ६०% आवश्यक आहेत.
- ९ पास अर्थात १० वी पासपासून ते पुढील सर्व शिक्षणाकरिता अर्ज करता येईल.
(प्रत्येक वर्षी अर्ज करता येतो.)
-फक्त शासनमान्य अभ्यासक्रम व शासनमान्य संस्थेला प्रवेश घेतलेल्यांनीच अर्ज करावा.
-मुक्त विद्यापीठ, बहिस्थ अभ्यासक्रम, दूरस्थ शिक्षण, अप्रेंटिशिप, स्टायपेंड घेणाऱ्यांनी अर्ज करू नये.
- अर्ज भरताना मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत, झेराॅक्स कागदपत्रे अपलोड केल्यास अर्ज बाद केला जाईल.
-अर्ज भरताना एकूण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी तपशील टाकायलाच हवा. ज्यांना ग्रेड, ग्रेड पाॅइंट किंवा इतर प्रकारे गुण दिले असतील तर त्यांनी काॅलेजकडून गुणांची टक्केवारी व गुण आणि स्वत:च्या नावाच्या तपशिलासह पत्र प्राप्त करून ते पत्र अपलोड करणे बंधनकारक आहे.
कामातून थोडा वेळ पाल्यासाठी काढा अत्यंत महत्त्वाचे जाणून घ्या
-दिव्यांगांना ६०% गुणांची अट असणार नाही. तो विद्यार्थी फक्त उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.- सदर शिष्यवृत्ती मंडळाची तरतूद व मेरिट या निकषावर दिली जाणार आहे.
(फक्त उत्तीर्ण निकाल चालेल. एटी-केटी चालणार नाही.)- अपूर्ण माहितीचा आणि चुकीची माहितीचा अर्ज ऑनलाइन भरल्यास अर्ज बाद केला जाईल, याची जबाबदारी कामगार व त्यांच्या पाल्याची आहे. ऑनलाइन विहित नमुन्यातील अर्ज भरावा लागेल.
शिष्यवृत्ती रक्कम माहिती खालीलप्रमाणे-
-दहावी ते बारावी.- रु. २,०००/-
-पदवी- रु. २,५००/-
-पदव्युत्तर पदवी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)- रु. ३,०००/-
- व्यावसायिक पदविका (डिप्लोमा)- रु. २,५००/-
-व्यावसायिक पदवी- रु. ५,०००/-
-पीएच.डी. नोंदणी- रु. ५,०००/-
-एमपीएससी प्रीलिम्स उत्तीर्ण- रु. ५,०००/-
- यूपीएससी प्रेलिमिनेटरी उत्तीर्ण- रु. ८,०००/-
-परदेशात शिकत असेल, तर रु. ५० हजार. (परदेश शिष्यवृत्तीचा स्वतंत्र ऑनलाइन अर्ज भरावा.)
कामगार बांधवांनो पाल्याकडे लक्ष द्या...
-३१ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे, नियमात बसणाऱ्या कामगारांनी ऑनलाइन अर्ज आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी भरून त्यांच्या शैक्षणिक कार्यात आपला हातभार लावावा. यासाठी जिल्हा, विभाग, औद्योगिक सेक्टरनुसार विभागाचे सहा. कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती सुरू आहे.
-विजय अहिरे, कल्याण निरीक्षक, कामगार कल्याण भवन, बजाजनगर