जागेच्या घोळात पैठण येथील जलकुंभाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:03 IST2021-05-28T04:03:57+5:302021-05-28T04:03:57+5:30
जनतेवर पाणीपाणी म्हणण्याची वेळ... पैठण : पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत दोन वर्षांपूर्वी नेहरू चौक व नवनाथ मंदिर येथे मंजूर झालेल्या ...

जागेच्या घोळात पैठण येथील जलकुंभाचे काम रखडले
जनतेवर पाणीपाणी म्हणण्याची वेळ...
पैठण : पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत दोन वर्षांपूर्वी नेहरू चौक व नवनाथ मंदिर येथे मंजूर झालेल्या जलकुंभाच्या बांधकामासाठी जागा निश्चित करण्यात नगर परिषद प्रशासनास अपयश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविलेली जागा डावलून न.प. प्रशासनाने आता दुसऱ्या जागेवर टाकीचे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने नागरिक संतापले आहेत. यामुळे शहरातील ७०० नागरिकांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नगर परिषद प्रशासनास दिला आहे.
पैठण शहरातील नेहरू चौक व नवनाथ मंदिर परिसरात जलकुंभ बांधण्यासाठी लागणारी जागा नगर परिषदेने
उपलब्ध करून न दिल्याने मंजूर असलेल्या जलकुंभाचे काम सुरू करता आले नाही, असा लेखी खुलासा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने काही दिवसांपूर्वी करण्यात आला. यानंतर जून २०२० मध्ये झालेल्या पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाच्या बैठकीत न.प. कार्यालयासमोर असलेली जुनी तहसील कार्यालयाची इमारतीची जागा नगर परिषदेने ताब्यात घेऊन जलकुंभाच्या बांधकामासाठी जीवन प्राधिकरणास उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, पुढे त्यात काहीही झाले नाही. याचा परिणाम परिसरात सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
चौकट
दोन जलकुंभांच्या बांधकामास मंजुरी
पैठण शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नेहरू चौक परिसरातील जीर्ण झालेला जलकुंभ पाडून तेथे नवीन ७.७० लक्ष क्षमतेचा जलकुंभ व वाढीव पाण्याची गरज भागविण्यासाठी नवनाथ मंदिर परिसरात ४.९० लाख लीटर क्षमतेचा नवीन जलकुंभ बांधण्याच्या कामास पैठण-आपेगाव विकास
प्राधिकरणातून मंजुरी देण्यात आली आहे. याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सोपविली आहे. मात्र, अजून याला मुहूर्त सापडला नाही.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची टोलवाटोलवी
एमजेपीला जलकुंभाच्या बांधकामाचे आदेश दिल्यानंतर वर्षभरानंतर
एमजेपीच्या अभियंत्यांनी खुलासा करताना नगर परिषद कार्यालयाजवळील अस्तित्वातील जलकुंभ पाडण्यापूर्वी या भागात बायपासद्वारे सर्व भागांना समान व सुरळीत पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. जलकुंभातून तीन वेळा बायपासद्वारे पाणी वितरण व्यवस्थेत सोडून चाचणी घेण्यात आली. मात्र, वितरण व्यवस्था पस्तीस वर्षे जुनी असल्याने उंच भागात पाणी पोहोचू शकले नाही. तसेच नवीन जलकुंभासाठी जास्त जागा लागते. मात्र, अस्तित्वातील जागा कमी पडत आहे. शेजारी कब्रस्थान व खाजगी घर असल्याने येथे जलकुंभ बांधता येणे शक्य नसल्याचा खुलासा एमजेपीने केला आहे. यासाठी नवीन जागा द्यावी अशी शिफारस एमजेपीने प्राधिकरणाकडे केली. नवनाथ मंदिराजवळ एक वर्षापूर्वी खोदकाम सुरू करण्यात आले. मात्र, स्थानिक नागरिकांनी हे काम बंद पाडले.