बंधाऱ्यांच्या कामांना अखेर लागला मुहूर्त

By Admin | Updated: February 19, 2015 00:43 IST2015-02-19T00:34:08+5:302015-02-19T00:43:52+5:30

जालना : घाणेवाडी ते जालना या कुंडलिका नदीमध्ये शिरपूर पद्धतीचे बंधारे करण्याच्या कामाला दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुहूर्त लागला असून

The work of the barns finally started | बंधाऱ्यांच्या कामांना अखेर लागला मुहूर्त

बंधाऱ्यांच्या कामांना अखेर लागला मुहूर्त


जालना : घाणेवाडी ते जालना या कुंडलिका नदीमध्ये शिरपूर पद्धतीचे बंधारे करण्याच्या कामाला दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुहूर्त लागला असून या कामासाठी गेल्या पंधरवाड्यात ई-निविदा काढण्यात आल्या असून १२ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्यांची कामे करण्यात येणार आहेत.
२०१२-१३ चा भीषण दुष्काळ जालनेकरांनी अनुभवला. याच काळात मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी कोरड्या घाणेवाडी तलावाची पाहणी केल्यानंतर बंधाऱ्यांच्या कामासाठी ८ कोटींचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ७ मे २०१३ रोजी जालना दौऱ्यात हा निधी जालन्यासाठी मंजुर झाल्याचे जाहीर केले. तर २० मे २०१३ रोजी ही रक्कम जिल्ह्याला प्राप्तही झाली.
शासनाच्या निर्देशानुसार या बंधाऱ्यांच्या निर्मितीसाठी शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती तयार करण्यात आली. समितीच्या नियंत्रणातून बंधारे तयार करावेत, असे आदेश शासनाने काढले. १७ जुलै २०१३ ला या समितीची पहिली बैठक झाली. बंधाऱ्यांचे आराखडे, अंदाजपत्रक, रेखाचित्र तसेच बंधाऱ्यांची स्थाननिश्चिती करण्याचे अधिकार खानापूरकर यांना देण्यात आले.
खानापूरकर यांच्यासह घाणेवाडी जलसंरक्षण मंचचे सुनील रायठठ्ठा, सुनील गोयल, रमेशभाई पटेल, सुरेश कुलकर्णी व स्थानिक स्तर लघुपाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता ए.ए. कांबळे यांनी घाणेवाडी ते जालना या कुंडलिका नदीमध्ये चालत ६ बंधाऱ्यांची स्थाननिश्चिती केली.
सावित्रीबाई फुले एकात्मता समाज मंडळ या संस्थेच्या जालना शाखेतर्फे या सहाही बंधाऱ्यांचा आराखडा, संकल्पचित्र व अंदाजपत्रक तयार करण्यात आले. खानापूरकर यांच्यामार्फत ते शासनाकडे सादर करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी ६ बंधाऱ्यांच्या कामांची निविदा काढण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे स्थानिक स्तर लघुपाटबंधारे विभागाने ती व्यवगत केली. त्यानंतर खानापूरकर यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी पुन्हा पाठपुरावा केला. परंतु विधानसभा निवडणुकांमुळे हे काम लांबणीवर पडले. २४ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले एकात्मता समाज मंडळ व घाणेवाडी जलसंरक्षण मंचच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांना या कामांसाठी साकडे घातले. पालकमंत्री लोणीकर यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून बंधाऱ्यांच्या कामांची निविदा काढण्याची सूचना केली. त्यानंतर या कामाला गती आली. सध्या ई-निविदा काढण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
याबाबत घाणेवाडी जलसंरक्षण मंचचे सुनील गोयल म्हणाले की, जालना शहर व परिसरातील पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी या बंधाऱ्यांचा मोठा उपयोग होणार आहे. शिवाय शेतीचे सिंचन वाढीसाठीही त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांची कामे लवकर व पारदर्शकपणे होणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्हीही त्यावर लक्ष ठेवणार आहोत.
आठ कोटींचा निधी घाणेवाडी ते जालना कुंडलिका नदी दरम्यान आठ बंधारे उभारण्यासाठी मंजुर करण्यात आला. मात्र त्यातील दोन बंधाऱ्यांच्या स्थाननिश्चितीला जिल्हा परिषदेने आक्षेप घेतला. या दोन्ही ठिकाणी पूर्वी जि.प. लघुपाटबंधारे विभागाने कोल्हापुरी बंधारे तयार केले होते. त्यासाठी केलेला खर्च अगोदर द्या, अशी मागणीही जिल्हा परिषदेने केली. त्यामुळे दोन बंधाऱ्यांची कामे वगळून अन्य सहा कामांचा निर्णय समितीने घेतला.
स्थानिक स्तर लघुपाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता ए.ए. कांबळे म्हणाले की, सहा बंधाऱ्यांच्या कामाची ई-निविदा काढण्यात आली आहे. त्यासाठीची अंतिम मुदत १२ मार्च २०१५ आहे. पावसाळ्यापूर्वी या बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

Web Title: The work of the barns finally started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.