चिकलठाण्यातून चालते २२ टपाल कार्यालयांचे काम
By Admin | Updated: July 30, 2014 01:18 IST2014-07-30T01:13:09+5:302014-07-30T01:18:21+5:30
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद चिकलठाणा टपाल कार्यालयांतर्गत ग्रामीणच्या २२ टपाल शाखा कार्यालयांचा कारभार अंधाऱ्या खोलीत चालत असून, कर्मचाऱ्यांना बसण्याची व कागदपत्रे ठेवण्याची तोकडी व्यवस्था आहे.
चिकलठाण्यातून चालते २२ टपाल कार्यालयांचे काम
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद
चिकलठाणा टपाल कार्यालयांतर्गत ग्रामीणच्या २२ टपाल शाखा कार्यालयांचा कारभार अंधाऱ्या खोलीत चालत असून, कर्मचाऱ्यांना बसण्याची व कागदपत्रे ठेवण्याची तोकडी व्यवस्था आहे.
महानगरपालिकेच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर चिकलठाणा टपाल कार्यालय असून तळमजल्यात महापालिकेचा रात्रीचा निवारा आहे. त्यामध्ये मात्र आधुनिक फरशी व सुरळीत वीज पुरवठा आहे. टपाल कार्यालय अडगळीच्या खोलीत कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी टपाल कार्यालयासाठी जालना रोडवर प्रशस्त इमारतीचा प्रस्ताव मुख्यालयात सादर करण्यात आला आहे. एक इमारत पसंत केली. परंतु त्या जागेवर टपाल कार्यालयाच्या वरिष्ठांसोबत फक्त चर्चाच सुरू आहे.
वाकुळणी, शेकटा, चितेगाव, लाडसावंगी, पिंप्री, कचनेर, करमाड, दुधड आदींसह २२ शाखा टपाल कार्यालयांचे टपाल कर्मचारी चिकलठाणा कार्यालयात टपालाची आदान प्रदान करतात. कार्यालयाच्या छताला अनेक ठिकाणी गळती लागली असून, अंधुक प्रकाशात कारभार चालतो. जनरेटर बंद असते व वीज पुरवठा खंडित झाल्यास संगणक बंद पडतात. यामुळे टपाल कर्मचारी व ग्राहकांची गैरसोय होते. आधार कार्ड, महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी अनेकजण टपाल कार्यालयात खेट्या घालतात. अतिक्रमणाच्या व अडगळीच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयाची इमारतच अनेकांना सापडत नाही. सुसज्ज इमारतीत हे कार्यालय हलवावे, अन्यथा सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे.
स्वतंत्र इमारत हवी
चिकलठाणा टपाल कार्यालयात कोणत्याही आवश्यक सुविधा नाहीत. अनेकांना कार्यालय आहे कुठे हेच समजत नाही. कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलत्या काळानुसार बदलावा.
- धम्मपाल नरवडे
अंधार असतो
४कार्यालयाची वीज अनेकदा नसते व तेव्हा कार्यालयातील संगणक बंद पडतात. आॅनलाईन कामे होत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना कार्यालयात चकरा माराव्या लागतात.
- नागपाल गंगावणे
फरशी तुटल्या
कार्यालयाभोवती अतिक्रमणे झाली आहेत. पायऱ्या तुटल्यामुळे वृद्धांचे पाय घसरून अपघात होण्याची भीती असून इमारतीच्या दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष जाणवते, त्यामुळे कार्यालय इतरत्र हलवावे.
- संतोष पारखे