वारुळाच्या पुजेसाठी महिलांची गर्दी
By Admin | Updated: August 18, 2015 23:59 IST2015-08-18T23:59:22+5:302015-08-18T23:59:22+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेच्या मंगळवारी चौथ्या दिवशी सुवासिनी महिलांचा उपवास असल्याने नागोबा मंदिरात हजारो महिलांनी

वारुळाच्या पुजेसाठी महिलांची गर्दी
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेच्या मंगळवारी चौथ्या दिवशी सुवासिनी महिलांचा उपवास असल्याने नागोबा मंदिरात हजारो महिलांनी पूजा व दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात असणाऱ्या वारुळाची महिलांनी पूजा करुन दोरा गुंडाळून ‘बहिण-भावाचे नाते जन्मोजन्मी अखंड राहु दे’, असे साकडे घालून दूध, लाह्या अर्पण करुन उपवास सोडला.
आषाढ अमावस्येपासून सावरगाव येथील नागोबा यात्रेस प्रारंभ झाला. मंदिरासमोरील दगडी शिळात साप-पाल-विंचू या उभयचर प्राण्याचे आगमन झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सोमवारी पहाटे खरगा भाकणूक असे विधीवत कार्यक्रम पार पडले. मंगळवारी यात्रेच्या चौथ्या दिवशी सुवासिनी महिला भावाचा उपवास करुन दुपारी १२ वाजता मंदिरात पूजा दर्शनासाठी गर्दी केली होती. पाच दिवस एकत्रीत असलेले साप-पाल-विंचवाचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दूध, लाह्या अर्पण करण्यात आल्या. मंदिराजवळ असणाऱ्या वारुळाला महिलांनी दोरा गुंडाळून बहिण भावाचे नाते जन्मोजन्मी अखंड राहु दे अन् सदैव पाठीशी रहा, असे साकडे घालून पूजा विधी करुन उपवास सोडला.
बुधवारी पहाटे नागोबा मूर्तीस अभिषेक होवून दुपारी ३ वाजता कल्याण स्वामी यांच्या घरातून गण पालखी मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. टाळ मृदंगाच्या गजरात ही मिरवणूक सायंकाळी साडेपाच वाजता आल्यानंतर तिथे पूजा गजर होवून भाकणूक, दहिहंडी फोडून पंचारतीने यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेनिमित्त खासगी मंडळाकडून भाविकांच्या स्वागतासाठी कमानी उभारण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात खेळणे, पाळणे, मिठाईची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली आहेत.
यात्रेतील वाढती गर्दी लक्षात घेता, तामलवाडी पोलिसांनी मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. तसेच यात्रेसाठी तुळजापूर आगाराने जादा बसेसचीही सोय केली आहे. (वार्ताहर)
मंदिराशेजारी असणाऱ्या भाकणूक ओठ्यावर बिंचू डोके हे खरीप व रबी हंगामातील धान्य मांडतो. त्यावेळी गण म्हणून परिचित असणारे कल्याण स्वामी भाकणूक कार्यक्रमात कोणती पिके हाती लागणार, पर्जन्यमान कसे राहील याची भाकणूक करतात. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ५ ते ६ वाजता पार पडतो. तर बिंचू डोके यांना पिढीजात धान्य मांडण्याचा मान यात्रा सुरु झाल्यापासून आहे.
४यात्रेत रामलिंग गाबणे, बाळू तानवडे, राजेंद्र तोडकरी, जनार्दन तानवडे गणाचे खांदेकरी म्हणून सेवा करतात. तर महारुद्र अक्कलकोटे, पिंटू तानवडे, दत्तात्रय लिंगफोडे, गणपत तानवडे, दत्ता काडगावकर, पिंटू काडगावकर, धनाजी काडगावकर हे गण मिरवणुकीत काथ्या म्हणतात. हा मान अनेक वर्षापासून आहे.