ऑनलाईन लोकमत/ राम शिनगारे
औरंगाबाद, दि. १९ : राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, मुंबईमध्ये अज्ञातांनी महिलांची वेणी कापण्याचे प्रकार घडले आहेत. हे लोण आता औरंगाबादेतही दाखल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छावणीतील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी पतीसह गेलेल्या एका महिलेची वेणी कापण्यात आली आहे. या घडलेल्या प्रकाराविषयी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शहरातील बेगमपुरा भागातील रहिवासी असलेल्या मंगला (नाव बदलले आहे.) या पतीसह गुरुवारी छावणीत भरणा-या आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी सायं. ५.३० वाजेदरम्यान गेल्या होत्या. विद्यापीठातील काही मुलांसाठी घरी मेस चालविण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची खरेदी सुरू होती. बाजारातील गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने मंगला यांची वेणीच कापून टाकली. वेणीवर क्लिप लावलेली असल्यामुळे केस घटनास्थळी गळाले नाहीत. मात्र, घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तेव्हा मंगला यांना काहीच सुचेना. त्यांना रडू कोसळले. भीती वाटू लागली असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तेव्हा पतीने मंगलास धीर देत थेट छावणी पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी पोलिसांनी पर्सची दोरी कापताना वेणी कापली असेल, असे सांगितले. मात्र, पर्सला काहीच हानी पोहोचली नसल्याचे पीडितेने दाखवून दिले. त्यानंतर पोलिसांनी मंगला यांची केस कापल्याची तक्रार दाखल करून घेतली आहे. केस कापण्याचा शहरात घडलेला हा पहिलाच प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.
नेमका काय प्रकारउत्तर भारतामध्ये महिलांची वेणी कापण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात हरियाणा १७, उत्तर प्रदेश ५, तर दिल्लीमधील ३ घटनांचा समावेश आहे. उत्तर भारतातील हे लोण मुंबईत दाखल झाले. मुंबईतील भायखळा, आग्रीपाडा, वडाळ्यात वेणी कापण्याचे प्रकार घडले आहेत. आता औरंगाबादेतही असाच प्रकार घडल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांचे दुर्लक्षछावणी पोलीस ठाण्यात सायं. ८ वाजेदरम्यान पीडित महिलेने वेणी कापल्याची तक्रार दाखल केली. ही तक्रार पोलिसांनी स्वीकारली. मात्र, एक दिवस उलटला तरी कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याचे स्पष्ट झाले. छावणीचे पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयीची माहिती संबंधित तक्रार घेणारांनी दिली नाही. तरी याविषयी तपास करण्यासाठी तात्काळ पावले उचलण्यात येतील, असे स्पष्ट केले.
महिलेची तब्येत बिघडलीवेणी कापल्याचा प्रकार घडल्यानंतर त्या महिलेची तब्येत बिघडली आहे. घटना घडल्यापासून महिलने अंथरूण धरले आहे. केसांवरून गेले; पण कात्री तिच्या गळ्याला लागली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. ही घटना आठवून प्र्रचंड भीतीने तिची तब्येत बिघडली असल्याचे पीडितेच्या सासूंनी सांगितले.
घटनांमागे केवळ विकृती आपण कोणत्या दिशेने जात आहोत, हेच कळत नाही. महिलांना बाहेर पडणे कठीण बनले. मुले आत्महत्या करीत आहेत. सर्वत्र सामाजिक समस्यांनी डोके वर काढले आहे. केस कापण्याच्या घटनांमागे केवळ विकृती हाच एकमेव प्रकार आहे. देशभरात सर्वत्र अशा घटना घडत आहेत. याचे लोण आपल्या शहरात पोहोचले. हे धक्कादायक आहे.-डॉ. स्मिता अवचार, समाजशास्त्रज्ञ