रेल्वेत महिला चोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST2021-02-05T04:22:32+5:302021-02-05T04:22:32+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वेकडे चोरट्यांचा मोर्चा वळला आहे. नांदेड-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी एका महिला ...

रेल्वेत महिला चोरांचा धुमाकूळ
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वेकडे चोरट्यांचा मोर्चा वळला आहे. नांदेड-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी एका महिला प्रवाशाच्या पर्समधील रोख रक्कम आणि कानातील सोन्याचे दागिने तीन महिलांनी लंपास केले; परंतु ही बाब लक्षात येताच लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे प्रवासी सेनेच्या प्रयत्नामुळे या तिन्ही महिला आरोपींना जेरबंद करण्यात आले.
मुमताज मोहंमद सरोदिया (६०, रा. गुजरात) असे फिर्यादी महिला प्रवाशाचे नाव आहे. नंदीग्राम एक्स्प्रेसमधून प्रवास करताना औरंगाबाद-लासूर प्रवासादरम्यान त्यांच्या पर्समधील ७ हजार रोख रक्कम आणि कानातील सोन्याचे दागिने चोरीला गेले. हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे रेल्वेत एकच गोंधळ उडाला. हा प्रकार रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना कळाला. लासूर स्टेशन येथून तिन्ही संशयित महिलांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना वेळीच रोखण्यात आले. औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांनी तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनकर डंबाळे, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंदकुमार शर्मा, शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश दंडे आणि रेल्वे प्रवासी सेनेने आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक के. एस. जाधव हे पुढील तपास करीत आहेत.