महिलांनी समाजाकडे प्रगल्भतेने पाहण्याची गरज
By Admin | Updated: January 14, 2015 00:54 IST2015-01-14T00:28:26+5:302015-01-14T00:54:39+5:30
जालना : महिलांनी समाजाकडे समंजस, प्रगल्भतेने पाहण्याची गरज आहे. मुळात महिलेने विचार करणे गरजेचे आहे. त्याची सुरूवात करणे,

महिलांनी समाजाकडे प्रगल्भतेने पाहण्याची गरज
जालना : महिलांनी समाजाकडे समंजस, प्रगल्भतेने पाहण्याची गरज आहे. मुळात महिलेने विचार करणे गरजेचे आहे. त्याची सुरूवात करणे, हेच या संमेलनाचे प्रमुख उद्दीष्ट असल्याची माहिती मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या कार्यवाह डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी दिली. जालना येथे १७ आणि १८ जानेवारी रोजी हे संमेलन होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांचची विशेष मुलाखत घेतली.
महिला लेखकांचे प्रमाण कमी का?
- समाजात घडणाऱ्या घटनांचे पडसाद विविध माध्यमातून उमटत असतात. संवेदनशील माणूसच या प्रकाराकडे वळतो. कधी शिल्पातून, कधी साहित्यातून तर कधी चित्रांतून तो व्यक्त होतो. लिखाण करणाऱ्यांमध्ये पुरुषांचीच संख्या जास्त असते. जगभरात हेच वास्तव आहे. म्हणजे हे अनुभव स्त्रिया घेत नाहीत का? समाजातील बदलांकडे पाहता येईल, एवढा वेळ मिळायला हवा. स्त्रियांना तोच मिळत नाही. किंवा हे मांडणे गरजेचे आहे, ही समज त्यांच्यामध्ये आली नाही. आपण व्यक्त झालो तर इतरांना प्रेरणादायी ठरू शकतो, आपले ओझे हलके होते, हे जाणीव फार कमी महिलांना होते. ज्यांना होते, त्या लेखणात उतरतात.
त्याला पुरूष जबाबदार कसे?
- आजच्या स्त्रिया कुटुंबामध्ये-स्वत:मध्ये गुंतल्या आहेत, असा आक्षेप घेतला जातो. कुठलीही स्त्री पहा. ती एवढ्या पातळीवर विभागल्या गेली की लिखाणासाठी तिला वेळच मिळत नाही. माझ्यासमोर अशी तीन उदाहरणे आहेत. यातील एकतर संमेलनाची माजी अध्यक्षा आहे.व्यथा काय असते? कळत नकळत आपल्या स्त्रीकडून अपेक्षा जास्त आहेत. आपल्याला ती आई म्हणून हवी असते. पत्नी म्हणून हवी असते. बहिण म्हणूनही हवी असते. मग क्षमता असूनही ती लिखाणासाठी वेळ देऊ शकत नाही. हीच आजची शोकांतिका आहे. माझा संसार संपला. नंतर मुलांचा-मुलींचा संसार सुरू होतो. सासूने-आजीने लहान मुलांना पहावे, अशी अपेक्षा असते. आजोबाने ते करावे, अशी अपेक्षा फार कमी ठिकाणी दिसते. कळत नकळत अति प्रेमापोटी म्हणा पुरूषांकडून महिलांवर काही गोष्टी लादल्या जातात. बाजारात खरेदीसाठी जाऊ न देण्याचेच उदाहरण पाहा. त्यामुळे तिला अनुभवच मिळत नाही. मग अचानक एखाद्यावेळी तू स्वत: खरेदी कर, ते फार अवघड नाही असा सल्ला देणे हे दुटप्पी नव्हे का?
या बारीक बारीक गोष्टी आहेत. पण त्यामुळे महिलांवर मर्यादा येत
आहेत. ते समजन घेण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने या संमेलनाला यायला हवे.
महिला संमेलन कशासाठी?
- संमेलन ही एक चळवळ आहे. नवीन पिढीने सजग जाणिवेने हे जग अनुभवायला हवे. स्त्रियांचे प्रश्न निर्माण का होतात, याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी नोकरीच करायला पाहिजे असे नाही. तर गृहिणी म्हणूनही हे काम करता येते. लहान वयातच सजग जाणिवेची निर्मीती आवश्यक आहे. स्त्री-पुरूषांची एकमेकांना किती गरज
आहे? दोघांचाही सन्मान ठेवणे किती गरजेचे आहे, हे त्यांना पटवून द्यायला हवे. हे समजून घेण्यासाठी अशा महिला संमेलनाची गरज आहे. या गतीमान युगात कोणासाठी कोणालाच वेळ नाही. ठरवनूही आपण तो देऊ शकत नाही. हे सारे करीत असताना भावनिक विकास तेवढाच महत्त्वाचा आहे. या विकासात पुस्तकाचा फार मोठा वाटा आहे. संमेलनाच्या निमित्ताने मोठा पुस्तकसाठाही उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)
आत्मभान जागे करुन समाजाकडे समंजस, प्रगल्भतेने पाहण्याची गरज आहे. तो विचार देण्यासाठी अशा संमेलनाची गरज आहे. मुळात महिलेने विचार करणे गरजेचे आहे. त्याची सुरूवात करणे, हेच या संमेलनाचे प्रमुख उद्दीष्ट आहे. या संमेलनात येणारी प्रत्येक महिला किमान एक तरी विचार घेऊन बाहेर पडेल. तोच विचार पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारा आहे.