राज्यात ५१ बसस्थानकांतील प्रसाधनगृहांत महिलांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:36 IST2018-11-29T00:34:11+5:302018-11-29T00:36:45+5:30
एसटी महामंडळाच्या बसस्थानकातील प्रसाधनगृहांत महिलांची आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसाधनगृहांत लघुशंकेची सुविधा मोफत असताना ५१ बसस्थानकांत महिलांकडून पैशांची आकारणी केली जात असल्याचे उघडकीस आले.

राज्यात ५१ बसस्थानकांतील प्रसाधनगृहांत महिलांची लूट
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या बसस्थानकातील प्रसाधनगृहांत महिलांची आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसाधनगृहांत लघुशंकेची सुविधा मोफत असताना ५१ बसस्थानकांत महिलांकडून पैशांची आकारणी केली जात असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या एसटी महामंडळाने विभाग नियंत्रकांना बसस्थानकातील प्रसाधनगृहांना भेटी देण्याची सक्त सूचना केली आहे.
एसटी महामंडळातर्फे बसस्थानकांतील प्रसाधनगृहांत लघुशंकेसाठी मोफत सुविधा दिली जाते; परंतु बसस्थानकांमध्ये महिलांची अडवणूक करून जबरदस्तीने पैसे आकारले जातात. बस पकडण्याची घाई आणि माहितीचा अभाव, यामुळे पैसे देण्याशिवाय महिला प्रवाशांसमोर पर्याय नसतो. काही प्रवाशांमुळे हा प्रकार अधिकाऱ्यांपर्यंत जातो; परंतु प्रत्यक्षात काहीही कारवाई होत नाही. याचाच फायदा घेत प्रसाधनगृहचालक महिनोन्महिने पैशांची कमाई करीत आहेत. यासंदर्भात एसटी महामंडळातील वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकाºयांपर्यंत तक्रारी पोहोचल्या होत्या. त्यामुळे सुरक्षा व दक्षता अधिकाºयांनी राज्यभरातील बसस्थानकांतील प्रसाधनगृहांमध्ये अचानक तपासणी केली. तेव्हा प्रसाधनगृहातील अनेक गैरप्रकार उघडे पडले.
दक्षता सुरक्षा अधिकाºयांनी केलेल्या तपासणीत राज्यातील कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणीसह राज्यात ५१ ठिकाणच्या प्रसाधानगृहांत महिलांकडून २ रुपयांपेक्षा जास्त रुपयांची आकारणी केली जात असल्याचे आढळून आले. २२३ ठिकाणी महिलांच्या प्रसाधनगृहात महिला कर्मचाºयांची नेमणूकच केलेली नसल्याचाही गंभीर प्रकार समोर आला. या प्रकाराची एसटी महामंडळाने गांभीर्याने नोंद घेत विभाग नियंत्रकांना एका पत्राद्वारे सूचना केल्या आहेत.
प्रसाधनगृहाच्या दर्शनी भागात लघुशंकेच्या मोफत सुविधेसह शौचालय, स्नानगृह वापरण्याच्या दरासंदर्भात फलक लावण्यात यावा. महिलांकडून पैसे घेण्यात आल्याची तक्रार सिद्ध झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आाहे. महिला प्रसाधनगृह वापर मोफत असल्याने स्वच्छता राखली जात नसल्याचे समोर आले. त्यामुळे महिला प्रसाधनगृहातील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी सक्त सूचना करण्यात आली आहे.
अहवाल देण्याची सूचना
१९४ प्रसाधनगृहांत शौचालय वापरासाठी पुरुषांकडून ३ रुपयांपेक्षा अधिक रुपयांची आकारणी केले जात असल्याचे समोर आले. प्रसाधनगृहासंदर्भात तक्रार आल्यानंतर सात दिवसांत संबंधित कार्यवाही करून पोच देण्यात यावी. विभाग नियंत्रक आणि तपासणी अधिकाºयांनी आगार भेटीत प्रसाधनगृहास भेट द्यावी, तसेच दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करून ३० नोव्हेंबरपर्यंत कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याची सूचना महाव्यवस्थापकांनी केली आहे.