लोकमत न्यूज नेटवर्कशिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे १८ जुलै रोजी १२ वाजता येथील महिलांनी अवैध दारुविक्रीविरुद्ध आक्रमक होत शिरडशहापूर येथील औंढा वसमत मार्गावरील असलेल्या ढाब्यावर व ढाब्याच्या पाठीमागे असलेल्या शेतात विकण्यासाठी जमिनीत पुरून ठेवलेली अवैध देशी व विदेशी दारु जवळपास पन्नास ते साठ महिलांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. शिरडशहापूर येथील दारुबंदीसाठी महिलांनी १ मे रोजी ग्रामसभेत लेखी अर्ज केला होता. परंतु कोणतीही कारवाई न झाल्यामुळे येथील महिलांनी दारुबंदीसाठी आक्रमक होऊन १५ जुलै रोजी येथील बाजाराच्या दिवशी येथील परवानाधारक देशी दारु दुकानावर हल्ला करून देशी दारुच्या बाटल्या व साहित्याची मोडतोड केली होती. तरीही शिरडशहापूर येथील बहुतेक ढाब्यांवर देशी व विदेशी अवैध दारु विक्री होत होती. त्यामुळे येथील सर्वच महिलांनी ढाब्यावर जाऊन तपासणी केली असता त्यांना येथील विविध ढाब्यावर देशी १५० बॉटल, विदेशी ६० बॉटल व हातभट्टी दोन बॉटल असा अंदाजे १६००० रुपयांची अवैध दारु पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही पकडलेली अवैध देशी व विदेशी दारु महिला पोलीस चौकीत घेऊन आल्या. कुरूंदा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रशांत भुते, बीट जमादार वाघमारे, पोकॉ ग्यादलवाड, वाघमारे, सावळे यांनी पंचनामा करून पुढील कारवाई करत आहेत. शिरडशहापूर येथील महिलांचा गावात संपूर्ण दारुबंदीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.दारुबंदीसाठी महिला आक्रमक झाल्या असून दारुबंदीसाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करून गावात लवकरात लवकर दारुबंदीची मागणी जोर धरत आहे.
महिलांनी पकडून दिला दारूसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:33 IST