स्त्रीची वाट आजही बिकटच !

By Admin | Updated: January 19, 2015 00:55 IST2015-01-19T00:40:15+5:302015-01-19T00:55:56+5:30

आद्य कवयित्री महदंबा साहित्यनगरी : राजकारणात स्वतंत्रपणे उभे राहू पाहणाऱ्या स्त्रीची वाट आजही मोठी अवघड आहे. स्त्रीने फारतर जिल्हा परिषद वा नगरपालिकेची निवडणूक लढवावी.

Woman's Waiting Still! | स्त्रीची वाट आजही बिकटच !

स्त्रीची वाट आजही बिकटच !


आद्य कवयित्री महदंबा साहित्यनगरी : राजकारणात स्वतंत्रपणे उभे राहू पाहणाऱ्या स्त्रीची वाट आजही मोठी अवघड आहे. स्त्रीने फारतर जिल्हा परिषद वा नगरपालिकेची निवडणूक लढवावी. त्यापुढे मजल मारली तर आम्ही पाहून घेऊ, अशी पुरुषी मनोवृत्ती तिचे पंख कापायला तयार असते. तिच्या चारित्र्यावर घाला घातला की ती मागे सरकते. संपत्ती व बळाचे विकृत डावपेच खेळता येत नसल्याने स्त्री मोडून पडते. एकहाती सत्तेमुळे आज राजकारणाचा पोत बिघडतो आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी प्रकट मुलाखतीदरम्यान सध्याच्या राजकारणावर आसूड ओढले.
सहाव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात सूर्यकांता पाटील यांनी आपला जीवनपट रसिकांसमोर उलगडला. या दिलखुलास मुलाखतीत ‘लोकराज्य’ मासिकाच्या माजी संपादक श्रद्धा बेलसरे-खारकर व कवयित्री सुमती लांडे यांनी त्यांना बोलते केले.
बालपणीचा काळ जागवताना पाटील म्हणाल्या, ‘माझे वडिल जयवंतराव पाटील हे निजाम कासीम रजवी याच्याशी झालेल्या लढाईत हुतात्मा झाले. त्यांच्या मृत्यूनंतर तीस दिवसांनी माझा जन्म झाला. मी स्वातंत्र्यसैनिकाची लेक आहे. मोहिमेवर जाताना वडिल आईला म्हणाले होते, ‘मला मुलगी होईल. तिचं नाव सूर्यकांता ठेव. त्याप्रमाणे माझे नाव ठेवले गेले. घरात गेल्या शंभर वर्षांपासून सुधारक वातावरण होते. मी घोडीवर बसून शाळेत जायचे. त्यामुळे तेव्हापासूनच मांड पक्की आहे!’ त्यांच्या या सूचक वाक्याला श्रोत्यांनी उस्फूर्त दाद दिली. पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण, वैवाहिक जीवनाचा प्रवास सांगितला. व्यापक राजकारणात उतरताना पतीसह घरच्यांचा झालेला विरोध, त्याला तोंड देत केलेला नगरसेवक ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास, बाईपणाचे अडथळे ओलांडण्याची शर्यत, अशा अनेक बाबींवर त्यांनी टाकलेला प्रकाश भारावून टाकणारा ठरला.
‘माझा संघर्ष आठवताना ‘मदर इंडिया’ चित्रपटातील नर्गिस मला आठवते. जीवापाड कष्ट करुन साकारलेल्या जगापासून एका क्षणी सहजपणे अलिप्त होणारी! तशी आज मी राजकीय जीवनातून विचारीपणे बाजूला झाले आहे. या सेकंड इनिंगमध्ये गृहवासी होत सुना-नातवांमध्ये रमते आहे! संसारीपणाचा आनंद अनुभवते आहे.’ सध्याच्या राजकारणातील संक्रमणांवर भाष्य करताना त्यांनी सध्या बळावत असलेल्या मनी-मसल पॉवरबाबत खंत व्यक्त केली.
राजकारणात उत्तुंग शिखर गाठले असले तरी मी शेवटी शेतकऱ्याची मुलगी आहे. वावरात फुलून आलेल्या पीकावर कीड पडली तरी मडक्यात शिल्लक असलेल्या अस्सल बियाण्यांवर शेतकऱ्याचा विश्वास असतो. त्याच्या बळावरच पुन्हा जोमात अंकुर उगवून येतात. तसेच आजचे राजकारण बहुतांशी भ्रष्ट झालेले असले तरी काही नवे तरुणच त्याला विधायक वळण देतील, स्वराज्याचे सुराज्य करतील, असा मला मनोमन विश्वास वाटतो, असा आशावाद सूर्यकांता पाटील यांनी व्यक्त केला.
एका हळव्या क्षणी सूर्यकांताताई बोलत्या की वडिलांच्या मृत्यूनंतर आईला कॉग्रेस (आय) ने तिकीट दिले. निवडणुकीत ती जिंकली. पण आता विधानसभेत म्हणून ती आमदार म्हणून जाण्याआधी मला जाणवले, आई तर निरक्षर आहे! आता ती कार्यकाळादरम्यान अंगठा उमटवणार. मला असे होणे मान्य नव्हते. मग मी तिला जिद्देसही शिकवली. तीही शिकली आणि झोकात सही करु लागली. एका आईची तिची मुलगीच विद्यापीठ बनली!

Web Title: Woman's Waiting Still!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.