जोगेश्वरीतुन मुलीसह महिला बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:08 IST2021-01-08T04:08:31+5:302021-01-08T04:08:31+5:30
वाळूज महानगर : जोगेश्वरीतून एक ३२ वर्षीय महिला ९ वर्षांच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज पोलीस ...

जोगेश्वरीतुन मुलीसह महिला बेपत्ता
वाळूज महानगर : जोगेश्वरीतून एक ३२ वर्षीय महिला ९ वर्षांच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे.
मीना विनोद इंगोले (३२, रा. शिवराज पार्क, जोगेश्वरी) ही महिला मुलगी कोमल (९) हीस सोबत घेऊन सोमवार (दि.४) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास बचत गटाचा हप्ता भरून येते, असे म्हणून घराबाहेर पडली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत या दोघी मायलेकी घरी न परतल्यामुळे विनोद इंगोले यांनी पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. या दोघींचा शोध सहायक फौजदार जगदाळे करत आहेत.
फोटो क्रमांक- मीना इंगोले
फोटो क्रमांक कोमल इंगोले
-----------------------
वडगावात बचत गटाच्या महिलांचा सत्कार
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी (दि.५) बचत गटातील महिलांचा सत्कार करण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनील चिपाटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सुनीता जगताप, सुमन साबळे, अंजाबाई तुपे, मंगलबाई वाहूळ, माजी सरपंच इंदूबाई वाहूळ, शाळेच्या पदवीधर शिक्षिका अनिता राठोड, योगिता देवकाते, विद्या सोनेने, रिटा मार्कंडे आदींचा सत्कार करण्यात आला.
फोटो ओळ- वडगाव कोल्हाटी जि.प. शाळेत शिक्षिका व बचत गटातील महिलांचा सत्कार करण्यात आला.
फोटो क्रमांक- सत्कार
-----------------------------
जोगेश्वरीत गुटख्याची सर्रास विक्री
वाळूज महानगर : जोगेश्वरीत पानटपऱ्या, हॉटेल व किराणा दुकानांवर सर्रासपणे गुटख्याची विक्री केली जात आहे. या परिसरातील किशोरवयीन मुलासह अनेकांना गुटख्याचे व्यसन लागल्यामुळे पालकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. शासनाने गुटका विक्रीवर बंदी घातलेली असतानाही गावात मात्र खुलेआमपणे गुटका विक्री सुरू असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
--------------------------
बजाजनगरात बसथांब्याची दुरवस्था
वाळूज महानगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकातील बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. या बसथांब्याजवळ अतिक्रमण झाले असून बसथांब्यात केर-कचरा साचला आहे. अनेक जण गुटका व पान खाऊन थुंकत असल्यामुळे बसथांब्याची भिंतीही रंगल्या आहेत. परिणामी प्रवासी या बसथांब्यात न थांबता रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करीत असतात. या बसथांब्याची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
-------------------
वळदगाव- पंढरपूर रस्त्यावर अस्वच्छता
वाळूज महानगर : वळदगाव- पंढरपूर रस्त्यावर लगतच्या वसाहतीतील नागरिक केर-कचरा टाकत असल्याने या रस्त्यावर अस्वच्छता पसरली आहे. या रस्त्याच्या कडेला कचरा पडल्याने या दोन्ही गावांतील नागरिकांना नाक दाबूनच रस्त्यावरून ये- जा करावी लागत आहे. येथील विठ्ठल- रुख्मिणी मंदिरात भाविक दररोज सकाळी व सायंकाळी दर्शनासाठी जात असतात. मात्र, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे भाविकांना ये- जा करताना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
---------------------------