चार पैकी तीन जागा जिंकून राष्टÑवादीचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:50 IST2017-08-20T00:50:31+5:302017-08-20T00:50:31+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या चार जागांपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने तर एका जागेवर भाजपाने विजय मिळविला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

चार पैकी तीन जागा जिंकून राष्टÑवादीचे वर्चस्व
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा नियोजन समितीच्या चार जागांपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने तर एका जागेवर भाजपाने विजय मिळविला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
राकाँचे जुनेद खान अब्दुल्ला खान दुर्राणी (११७ मते), फारोकी साबिया बेगम कपिलूर रहेमान (८५०० मतांचे मूल्य), शमीम बेगम महंमद शरीफ (४५२९ मतांचे मूल्य) आणि भाजपचे शेख कलीम शेख रहिमोद्दीन (१२० मते) अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या २४ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद गटामधून १६ आणि महानगरपालिका गटामधून ४ असे २० उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर नगरपालिका गटातील चार जागांसाठी ८ उमेदवारी अर्ज राहिल्याने या जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली. रविवारी निकाल जाहीर झाला. सर्वसाधारण प्रवर्गातून पाथरी येथील राकाँचे गटनेते जुनेद खान दुर्राणी यांना १५१ पैकी ११७ मते मिळाली तर शिवसेनेचे उपनगराध्यक्ष विशाल कदम यांना २५ मते मिळाली. नागरिकांच्या मागास प्रवर्ग गटातून भाजपाचे शेख कलीम यांना १२० तर त्यांचे विरोधक शमीम बेगम शेख चाँद बागवान यांना २० मते मिळाली. सर्वसाधारण स्त्री गटातून दोन जागा निवडून द्यावयाच्या होत्या. त्यात राकाँच्या साबिया बेगम कपील फारोखी यांना ८५०० (मतांचे मूल्य) तर पठाण महेमुन्नीसा फायजखा यांना ३५०२, शैलेजा उमेशराव बारहाते यांना १२५३ आणि शमीम बेगम म.शरीफ यांना यांना ४५२९ मतांचे मूल्य मिळाले. विजयासाठी ४२०० मतांचे मूल्य घेणे आवश्यक होते. त्यामुळे साबिया बेगम कपिल फारुकी आणि शमीम बेगम महंमद शरीफ यांना विजयी घोषित करण्यात आले.
या निवडणुकीमध्ये आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, आ.मधुसूदन केंद्रे, आ.मोहन फड, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे, चंद्रकांत राठोड, अंकुश लाड, रामप्रभू मुंडे आदींनी एकत्र येत नगरपालिका गटातून विजय मिळविला.