आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेतील विजेते घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:06 IST2021-04-09T04:06:11+5:302021-04-09T04:06:11+5:30
औरंगाबाद : नवीन उद्योजक घडविणाऱ्या तसेच नवीन संकल्पना स्वीकारून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करणाऱ्या ‘मराठवाडा ॲक्सलरेटर फॉर ...

आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेतील विजेते घोषित
औरंगाबाद : नवीन उद्योजक घडविणाऱ्या तसेच नवीन संकल्पना स्वीकारून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करणाऱ्या ‘मराठवाडा ॲक्सलरेटर फॉर ग्रोथ ॲण्ड इन्क्युबेशन कौन्सिल’ (मॅजिक) या संस्थेच्या वतीने आयोजित ‘आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज २०२१’ या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, वेगवेगळ्या गटांतून सहा विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
उद्योग जगतात एक नवीन ऊर्जा निर्मण करण्याची क्षमता असलेल्या या उपक्रमातील स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. जानेवारी २०२१मध्ये या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. १७ राज्यांतील २५ शहरांतून अडीचशेपेक्षा जास्त नवीन आणि सृजनात्मक संकल्पना यात मांडण्यात आल्या. यामध्ये तब्बल ७० स्टार्टअप्स, ५० महिला उद्योजक, ४० पेटंटधारकांचा समावेश होता. यातून ९० प्रकल्पांना पहिल्या फेरीसाठी निवडण्यात आले होते. २१ फेब्रुवारीला या सर्वांचे सादरीकरण झाले. यातून निवडलेल्या २० जणांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेची अंतिम फेरी मार्च २१मध्ये घेण्यात आली. ‘मॅजिक’ची प्रोग्रॅम टीम आणि उद्योग जगतातील १५ ज्येष्ठ तज्ज्ञांनी याचे परीक्षण केले. हा सारा उपक्रम वेब मिटिंगच्या माध्यमातून साकारण्यात आला.
तब्बल चाळीस दिवसांचे परीक्षण, सादरीकरण यानंतर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सहा विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. यात सर्वसाधारण गटात कानपूर येथील लाइफ ॲण्ड लिम्ब या उपक्रमाचे निशांत अग्रवाल, पुणे येथील दि स्पेशल निन्जा लर्निंग अकॅडेमीच्या अवंतिका जोगळेकर आणि औरंगाबादच्या सुश्रुत डिझाइन्सचे अतुल खेरडे. महिला उद्योजक गटात कानपूर येथील डी डिझाइन्सच्या वैशाली बियाणी, उदयोन्मुख उद्योजक गटात चेन्नई येथील ग्रीनपॉड लॅब्सचे दीपक राजमोहन, मराठवाड्यातील उद्योजक औरंगाबादेतील ताजी भाजी या उपक्रमाच्या ज्योती निंभोरे आदींचा समावेश आहे.
‘मॅजिक’च्या वतीने या विजेत्यांना एकत्रित साडेतीन लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. बक्षीस वितरण लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. उद्योगांची शिखर संघटना असलेल्या ‘सीएमआय’च्या वतीने ‘मॅजिक’ची स्थापना करण्यात आलेली आहे.