विंडमिल कॉम्पिटिशन उत्साहात
By Admin | Updated: August 25, 2014 00:26 IST2014-08-24T23:58:33+5:302014-08-25T00:26:07+5:30
औरंगाबाद : विंडमिल (अ हँडस् आॅन सायन्स अॅक्टिव्हिटी कॉम्पिटिशन २०१४) ला शहरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विंडमिल कॉम्पिटिशन उत्साहात
औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आणि संडे सायन्स स्कूल यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित विंडमिल (अ हँडस् आॅन सायन्स अॅक्टिव्हिटी कॉम्पिटिशन २०१४) ला शहरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही स्पर्धा घेण्याचा उद्देश असा की, कृतीतून विज्ञान शिका ही संकल्पना लक्षात घेण्यात आली आहे. तसेच २० आॅगस्ट नॅशनल अक्षय ऊर्जा दिनाचे औचित्य साधून २४ आॅगस्ट, रविवार रोजी ही स्पर्धा लोकमत भवन येथे घेण्यात आली.
या स्पर्धेत एकूण ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात पवन ऊर्जा, तसेच पवनचक्कीच्या साहाय्याने जास्तीत जास्त एलईडी लाईट लावायचे होते. त्यात काही मुलांनी परिश्रम घेऊन शंभरचा आकडा गाठण्याचा प्रयत्न केला. या प्रकारची स्पर्धा महाराष्ट्रात प्रथमच घेण्यात आली. मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. यात पालक तसेच इंटरनेटच्या माध्यमातून माहिती गोळा करून हे प्रात्यक्षिक पूर्ण करायचे होते. मुलांना शाळेत पुस्तकी स्वरूपात शिकवण्यात येणाऱ्या प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जास्तीत जास्त एलईडीची ऊर्जा निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. आनंद करवे या वैज्ञानिकाशी भेटता येणार आहे. करवे यांचा ३१ आॅगस्ट रोजी तापडिया नाट्यमंदिरात सकाळी १०.३० ते १.०० वाजेपर्यंत कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ही या स्पर्धेची दुसरी फेरी असेल. यावेळी निवडक विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला जाईल. तसेच पालकांशी संवाद साधला जाईल. यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनी फोनद्वारे कळवण्यात येईल. यावेळी येताना मॉडेल सोबत आणण्याची आवश्यकता नाही. तसेच या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना आयोजकांतर्फे सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येईल.
पहिलाच अनुभव चांगला
शाळेत पाठ्यपुस्तकातून शिकलेले प्रयोग करताना खूप मजा आली. मला या प्रयोगासाठी माझ्या बाबांनी खूप मदत केली. प्रयोग करत असताना पडणाऱ्या छोट्या- छोट्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याशी संवाद साधला असता मिळत गेली आणि मी हा प्रयोग पूर्ण करू शकलो. आज या स्पर्धेत सहभाग घेऊन मला खूप चांगले वाटत आहे. तसेच असे प्रात्यक्षिक करण्यास मिळाले, ज्यामुळे मला वीजनिर्मिती कशी होते हे समजले. -पूर्वांक महेश गडे
प्रेरणा मिळाली
या स्पर्धेत मी पहिल्यांदाच प्रात्यक्षिक केले. सोल्ड्रिंग करण्याचा चांगला अनुभव आला. या प्रात्यक्षिक स्पर्धेतून मला खूप काही नवीन शिकायला मिळाले. या स्पर्धेतील हे मॉडेल तयार करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली होती. त्यातील शेवटचे ५ ते ६ दिवस दिवसभर काम केले. इंटरनेटच्या साहाय्याने मला खूप माहिती मिळवता आली. -सार्थ संदीप पंडित