शक्तिपीठ महामार्गाचे घोडे मोबदल्यावर अडणार का? संभ्रम पसरला
By विकास राऊत | Updated: July 29, 2025 16:27 IST2025-07-29T16:26:31+5:302025-07-29T16:27:57+5:30
समृद्धी महामार्गाला जमीन देणाऱ्यांना वाटाघाटीने दिली होती रक्कम

शक्तिपीठ महामार्गाचे घोडे मोबदल्यावर अडणार का? संभ्रम पसरला
छत्रपती संभाजीनगर : शक्तिपीठ या नवीन महामार्गासाठी जमीनमालकांना २०१३ चा भूसंपादन कायदा आणि महाराष्ट्र हायवे ॲक्टनुसार मोबदला दिला जाईल. तसेच, या मार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असल्याने २५ टक्के अतिरिक्त रक्कम संमती देणाऱ्यास अदा करण्याचा दावा करण्यात येत असला, तरी याबाबत सार्वजनिकरीत्या कोणतीही स्पष्टता एमएसआरडीसी आणि महसूल प्रशासनाने जाहीर केलेली नाही. प्रशासकीय पातळीवर बैठकांचा सोपस्कार सुरू असून, मोबदल्याबाबत स्पष्टता नसल्यामुळे शक्तिपीठाचे घोडे अडते की काय, अशी परिस्थिती आहे.
हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या सहा जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. सुमारे ५०० एकर जमीन या जिल्ह्यांतून संपादित करावी लागेल.
‘समृद्धी’साठी भूसंपादन कसे केले होते ?
भूसंपादनासाठी भूमी अधिग्रहण कायदा २०१३ लागू करून मोबदला दिला गेला. सरासरी बाजारभावाच्या २ ते ४ पट दर होता. जमीन कुठल्या उपयोगासाठी आहे (शेती, निवासी, व्यावसायिक) याचा विचार केला गेला. मागील ३ वर्षांत त्या भागातील नोंदणीकृत झालेले खरेदी-विक्री व्यवहारही लक्षात घेतले गेले होते. जमीनमालकाच्या खात्यात थेट एनईएफटी, आरटीजीएसद्वारे पैसे गेले. मंजूर यादीनुसार, प्रत्येक मालकाला त्याच्या क्षेत्रफळाप्रमाणे रक्कम दिली. जी जमीन संमतीने दिली गेली होती, तसे लिखित करार झाले. अनेक ठिकाणी फेरफार, वारसांमध्ये वाद, जमीन कागदपत्रांची कमतरता, बोगस दस्तऐवज, चुकीचा बाजारभाव, दलालांच्या मध्यस्थीमुळे शेतकऱ्यांना योग्य रक्कम मिळाली नाही. तसेच, निवाड्याने घेतलेल्या जमिनींची काही प्रकरणे न्यायालयात गेली.
एमएसआरडीसीचीचे म्हणणे...
समृद्धीप्रमाणेच शक्तिपीठसाठी भूसंपादन होईल. २०१३ आणि महाराष्ट्र हायवे ॲक्टनुसारच प्रक्रिया होणार आहे. समृद्धीच्या वेळी असलेले जमिनीचे दर आणि आजचे दर यात फरक आहे. कायद्यात अनेक तरतुदी आहेत. भूसंपादन एसडीएम किती सकारात्मकरीत्या काम करतील, त्यावर भूसंपादन प्रक्रियेचे भविष्य अवलंबून आहे, असे एमएसआरडीसी सूत्रांनी सांगितले.
हा मार्ग कशासाठी ?
शेतकऱ्यांना खरी गरज महामार्गाची नसून शाश्वत पाण्याची आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्ग असताना हा मार्ग कशासाठी, असा प्रश्न आहे. सरकारला खरेच शेतकरी समृद्ध करायचा असेल, तर जिल्ह्यासाठी ५ हजार कोटी रुपये पाण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत.
- अभिजीत देशमुख, बेगडा, धाराशिव
उपजीविकेचा प्रश्न
शक्तिपीठ महामार्गासाठी आमची ५ एकर जमीन संपादित होणार आहे. ही जमीन सिंचनाखालील असून, त्यात पारंपरिक पिके, तसेच भाजीपाला पिकवितो. ही जमीन महामार्गात गेल्यास कुटुंबातील ९ जणांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे.
- संभाजी फरताडे, मेडसिंगा, धाराशिव