आगाऊ कर्ज आकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविणार
By Admin | Updated: July 16, 2014 01:24 IST2014-07-16T00:00:20+5:302014-07-16T01:24:42+5:30
बीड : विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने मंगळवारी उपोषण केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी विविध बॅँकांचे व्यवस्थापक व शेतकरी संघटनेची बैठक घेतली.

आगाऊ कर्ज आकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविणार
बीड : विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने मंगळवारी उपोषण केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी विविध बॅँकांचे व्यवस्थापक व शेतकरी संघटनेची बैठक घेतली. यावेळी निऱ्हाळी म्हणाले की, जे बॅँक अधिकारी शेतकऱ्यांकडून अधिक पैसे आकारतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच रिझर्व बॅँकेच्या सूचनांचे पालन करण्याचेही यावेळी ते म्हणाले.
रिझर्व बॅँकेच्या परिपत्रकाला पायदळी तुडवीत विविध बॅँका शेतकऱ्यांकडून कर्ज आकारतात, पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची मागणी करतात तसेच नवीन पीककर्ज देण्यास बॅँका टाळाटाळ करतात आदी बाबत शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी उपोषण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी विविध बॅँकांच्या अधिकाऱ्यांची शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह बैठक घेतली.
या बैठकीत शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालीदास आपेट म्हणाले की, एक लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज देताना सातबारावर बोजा टाकू नये, स्टॅम्प घेऊ नयेत, बेबाकी प्रमाणपत्र घेऊ नये, बेबाकीसाठी शुल्क घेऊ नये तसेच मुदतीत कर्जफेड करताना व्याज घेऊ नये, अशा रिझर्व बॅँक व सहकार आयुक्तांच्या सूचना आहेत. असे असले तरी बॅँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास अनेक कागदपत्रांची मागणी करतात. यामुळे ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. तसेच काही बॅँका चढ्या दराने पीक कर्जाचे पैसे आकारतात. यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.
या बैठकीस अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक बोकाडे यांच्यासह सर्व बॅँकाचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते. पीक कर्ज देताना अडवणूक करू नये, नविन शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे तसेच अधिक पैसे आकारू नयेत, असे निऱ्हाळी यांनी बजावले. असे प्रकार कोणी केल्यास फौजदारी कारवाई करण्याची ताकीदही दिली. तसेच ज्या शेतकऱ्यांनी मुदतीत पीक कर्ज भरले आहे व त्यावरील व्याजही भरले आहे. अशा शेतकऱ्यांचे व्याज परत करण्याच्या सूचनाही निऱ्हाळी यांनी यावेळी केल्या. बैठकीस कालीदास आपेट यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीनंतर उपोषण मागे घेतले. (प्रतिनिधी)
सातबारावर बोजा चढवू नये
या बैठकीत अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक बोकाडे म्हणाले की, एक लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज दिल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढवू नये, अशा सूचना इतर बॅँक व्यवस्थापकांना केल्या आहेत. तसेच पीक कर्जासाठी शुल्क घेणार नसल्याचे फलक लावण्याचेही सांगितल्याचे ते म्हणाले. तसेच एक लाखांपर्यंतचे पीक कर्ज देताना स्टॅम्प घ्यावे की, घेऊ नये, या संदर्भात रिझर्व्ह बॅँकेला मार्गदर्शन मागविणार असल्याचेही ते म्हणाले.