छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गालगतच रेल्वेमार्ग करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर येथील एका कार्यक्रमात जाहीर केले. त्यामुळे नुकताच केंद्राला सादर झालेला छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या ८५ किमी अंतराच्या रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ गुंडाळणार का? असा सवाल रेल्वे संघटना, रेल्वे अभ्यासक उपस्थित करीत आहेत.
प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या ८५ किमी अंतराच्या रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. विद्युतीकरणासह हा रेल्वेमार्ग ‘सिंगल’ नव्हे, तर ‘डबल लाइन’चा करण्यात येणार आहे. यासाठी २ हजार २३५ कोटी रुपये गुंतवणूक निश्चित केली होती. या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा केली जात असतानाच आता छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गालगतच रेल्वेमार्गाची चर्चा पुढे आली आहे. त्यामुळे आता नेमका पुण्याला जाण्यासाठी कसा रेल्वे मार्ग होणार, याकडे लक्ष लागले आहे.
अनेक तोटेसध्याच्या छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वे मार्गाची अलाईनमेंट बदलली तर विनाकारण खर्च वाढेल. पुण्याचे अंतर वाढेल. घाट व बोगद्यांचा अडथळा येईल. अहिल्यानगरजवळ मुख्य स्टेशनला मार्ग जोडण्यासाठी भौगोलिक अडथळे येतील. हा नवीन मार्ग दुहेरी ऐवजी एकेरी होण्याची शक्यता राहील. त्यामुळे रेल्वेचा वेग कमी होऊ शकतो. वेगवान कनेक्टिव्हिटी व मालवाहतुकीचा मूळ उद्देश बाजूला पडेल.- प्रल्हाद पारटकर, सचिव, मराठवाडा रेल्वे कृती समिती
मुख्यमंत्र्यांना चुकीचे ब्रिफिंगसध्याची जी संभाजीनगर-अहिल्यानगर अलाईनमेंट निश्चित झाली आहे, ती केवळ ८० ते ८५ किमीची आहे. यात पूर्णपणे सपाट प्रदेश असून, कुठेही घाट किंवा बोगदा करण्याची गरज नाही. या उलट छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर एक्स्प्रेस महामार्ग हा पैठणमार्गे प्रस्तावित असून, अहिल्यानगरपर्यंतचे अंतर जवळपास १३० ते १४० किमी राहील. याला जोडून रेल्वे लाईन केली तर घाटाचा अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे खर्च वाढेल. रेल्वे जास्त उतार ठेवू शकत नाही. त्यामुळे रस्ता व रेल्वे घाटात एकत्र होणार नाहीत. नुकताच औट्रम घाटातील रेल्वे व रस्ते मंडळाचा एकत्रित बोगद्याचा प्रस्ताव रद्द झाला आहे. मुख्यमंत्र्यांना कोणीतरी चुकीचे ब्रिफिंग केलेले दिसते.- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक