वनोद्यान ठरतेय दिवास्वप्नच!
By Admin | Updated: May 13, 2014 01:11 IST2014-05-12T23:28:26+5:302014-05-13T01:11:13+5:30
गंगाराम आढाव , जालना शहरात वन विभागाच्या वतीने सिंदखेडराजा मार्गावर समारे ५ हेक्टर जागेवर वन पर्यटन उद्यान उभारण्यात येत आहे.

वनोद्यान ठरतेय दिवास्वप्नच!
गंगाराम आढाव , जालना शहरात वन विभागाच्या वतीने सिंदखेडराजा मार्गावर समारे ५ हेक्टर जागेवर वन पर्यटन उद्यान उभारण्यात येत आहे. मात्र, मागील वर्षभरापासून या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच दरेगाव शिवारातील वनोद्यानाच्या काम ही थंड झाले आहे. हे दोन्ही वनउद्यान जालनेकरांसाठी दिवास्वप्नच ठरत असल्याचे चित्र आहे. औरंगाबादसह इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्ह्यातील वनक्षेत्र कमीच आहे. मात्र, वनविभागाच्या अख्त्यारित असलेल्या जागेमध्ये वनउद्यान तयार करण्यासाठी प्रशासनानेच पुढाकार घेतला. जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी तसेच वन पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी शहरात दोन ठिकाणी वन उद्यान उभारण्यात येत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह वनअभ्यासकांना वनांमध्ये भटकंतीच्या अनुभवासह वन्यप्राणी, झाडे, वेली आदींचा अभ्यास करता येणार आहे. वन विभागाच्या वतीने दोन वर्षापूर्वी या उद्यानांची कामे हाती घेण्यात आली. या प्रकल्पातंर्गत वन विभागाने अनेक चांगली कामे केलेली आहेत. ५ हेक्टर वन क्षेत्रावर विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. तसेच पक्षी व वन्य प्राण्यांसाठी पानवठे तयार करण्यात आले आहेत. जॉगींग ट्रॅकसाठी कच्चे रस्ते तयार करण्यात आले. संपूर्ण निर्सगरम्य परिसर असल्याने हे उद्यान शहरवासिंयासाठी विरंगुळ्याचे साधन ठरेल असे वाटत होते. मात्र दोन वर्षाच्या काळात या उद्यानची कामे पाहिजे तशा गतीने झालेली नाहीत. त्यामुळे हे उद्यान जालनेकरांसाठी दिवास्वप्नच ठरणार की काय असा प्रश्न उभा राहत आहे. दरम्यान, उद्यानाच्या कामांसाठी आवश्यक तेवढा निधी अद्यापही प्राप्त झालेला नाही, त्यामुळे बहुतांश कामे रखडली आहेत. वन उद्यानांमधून अनेक मोठी आणि महत्वपूर्ण कामे करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आलेला आहे. मात्र त्या तुलनेत निधीची कमतरता भासत आहे. आतापर्यंत या उद्यानांमध्ये जवळपास १५ लाख रुपयांची कामे झालेली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन कासार यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. या उद्यानांच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. या ठिकाणी उद्यानात लहान मुलांच्या खेळणीसह परिसरात सुशोभिकरण करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींसह वनअभ्यासकांतून होत आहे. दरेगावचेही काम ठप्प शहराजवळील दरेगाव परिसरात असलेल्या वनविभागाच्या जागेवर वन सुशोभिकरणाचा प्रकल्प राबविण्यात येत होता. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी पुढाकार घेत उद्योजक व लोकवर्गणीतून याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करत, विविध कामे केली. परिसरात पाणवठे व सौरदिवे बसविण्यात आले. मात्र मुंढे यांची बदली होताच या ठिकाणची कामेही थंडावली आहेत. या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन कासार म्हणाले की, या उद्यानाच्या विकासासाठी सन २०१४- १५ मध्ये २१ हजार लहान मोठ्या वृक्षांची लागवड केली जाणार आहेत. तसेच नाविण्यपूर्ण असा बगीचा तयार करण्यात येणार आहे. लागवड केलेल्या वृक्षांना ठिबक सिंचनपद्धीने पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासह अन्य कामांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच उद्यान परिसरात वनकुटीचे बांधकाम करण्यात येत आहे.