पत्नीला झोपेत जाळले
By Admin | Updated: July 23, 2016 01:11 IST2016-07-23T00:20:49+5:302016-07-23T01:11:54+5:30
वाळूज महानगर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला जाळल्याची घटना वडगाव कोल्हाटी येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. पत्नी शंभर टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पत्नीला झोपेत जाळले
वाळूज महानगर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला जाळल्याची घटना वडगाव कोल्हाटी येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. पत्नी शंभर टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तीन चिमुकली मुले किरकोळ भाजली आहेत. पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
अशोक जाधव (४२) हे पत्नी शांताबाई (३५) व आपल्या ४ मुलांसह पवार यांच्या घरात भाड्याने राहत होते. अशोक पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत असे. काही महिन्यांपूर्वी शांताबाई रुसून घरातून निघून गेली होती. पण मुलांच्या ओढीने ती १०-१२ दिवसांपूर्वी पुन्हा पतीकडे आली. संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने अशोकने गुरुवारी मध्यरात्री झोपलेल्या शांताबाईस रॉकेल ओतून पेटवून दिले व पळ काढला. शांताबाई जोराने ओरडत कशाबशा बाहेर आल्या. आवाजाने जागे झालेल्या शेजारी वामन पाटोळे यांनी शांताबाईला विझविण्याचा प्रयत्न केला व पोलिसांना कळविले. पोलिसांनी शांताबाईस रुग्णालयात नेले. शांताबाई यांच्या जबाबावरून अशोकविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
मुले पोरकी ...
या दाम्पत्यास तीन छोट्या मुली व एक मुलगा आहे. जवळचे कोणीही नातेवाईक नाहीत. शांताबाई वाचेल याची खात्री नाही. अशोकला अटक झाल्याने ही मुले पोरकी झाली आहेत. विद्या तर केवळ एक वर्षाची आहे. आता या मुलांचे करायचे काय, असा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहिला आहे.