पतीच्या मृत्यंनंतर सहा महिन्यांनी पत्नीने स्वत:ला संपवले, ज्योतीनगरमधील घटना
By राम शिनगारे | Updated: March 29, 2023 20:57 IST2023-03-29T20:57:25+5:302023-03-29T20:57:38+5:30
उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

पतीच्या मृत्यंनंतर सहा महिन्यांनी पत्नीने स्वत:ला संपवले, ज्योतीनगरमधील घटना
छत्रपती संभाजीनगर : ऑक्टोंबर २०२२ मध्ये पतीचा मृत्यू झाल्यानंतर सहा महिन्यांनी पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ज्योतीनगर भागात उघडकीस आला आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती निरीक्षक गिता बागवडे यांनी दिली.
आरती हेमंत शर्मा (४५, रा. ज्योतीनगर) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आरती त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हत्या. तेव्हा घरातील सदस्यांनी खिडकीतुन आतमध्ये डोकावून पाहिल्यानंतर त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. तेव्हा दरवाजा तोडून नातेवाईकांनी आरती यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.
आरती यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरती यांचे पती हेमंत यांचा ऑक्टोंबर २०२२ मध्ये मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्यांची मनस्थिती ठिक नव्हती. यातच त्यांना बीपी, शुगरचा त्रास होता. या सर्व गोष्टीमुळे त्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. आरती यांच्या पश्चात १६ वर्षांची मुलगी आणि दहा वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. अधिक तपास हवालदार राणा जाधव करीत आहेत.