महापालिका निवडणुकीसाठी तुम्हाला उमेदवारी का द्यावी? शिंदेसेनेचा इच्छुकांना थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 19:44 IST2025-12-17T19:43:10+5:302025-12-17T19:44:01+5:30
निराला बाजार येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती सुरू

महापालिका निवडणुकीसाठी तुम्हाला उमेदवारी का द्यावी? शिंदेसेनेचा इच्छुकांना थेट सवाल
छत्रपती संभाजीनगर: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी अर्ज केलेल्या ८४१ इच्छुकांच्या शिंदेसेनेकडून सोमवारपासून मुलाखती सुरू आहेत. या मुलाखतीत तुम्हाला उमेदवारी का द्यावी, यासह ९ प्रश्न विचारण्यात आले.
उमेदवारांच्या मुलाखतीतील उत्तरे आणि त्यांची निवडणूक लढण्याची तयारी यावरून उमेदवारांची ए,बी,सी आणि डी अशी वर्गवारी करण्यात आल्याची माहिती शिंदेसेनेकडून समजली. महापालिका निवडणुकीचा बिगुल मंगळवारी वाजला आणि सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यात आला. शिंदेसेनेकडून मागील सप्ताहात इच्छुकांना अर्ज वाटप करण्यात आले होते. अर्ज नेलेल्या इच्छुकांपैकी ८४१ जणांनी अर्ज भरून पक्षाकडे सादर केले होते. निराला बाजार येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात बुधवारपासून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. मंगळवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. या मुलाखतीमध्ये इच्छुकांना नऊ प्रमुख प्रश्न विचारण्यात आले. उमेदवार सुरुवातीला कोणत्या प्रभागातून इच्छुक आहोत.
जात प्रवर्ग, वय, शैक्षणिक पात्रता आणि व्यवसाय तसेच प्रभागातील वास्तव्य कालावधी किती वर्ष आहे. पक्षात प्रवेशाची तारीख आणि पक्षातील सध्याची जबाबदारी, पद याविषयी विचारण्यात आले. ज्या प्रभागातून उमेदवारी हवी, त्या प्रभागाची व्याप्ती काय आहे, असा प्रश्न विचारून उमेदवाराला त्याच्या प्रभागाची माहिती आहे अथवा नाही हे तपासण्यात आले. प्रभागातील एकूण मतदार किती, असा एक प्रश्न विचारण्यात आला. प्रभागातील एकूण बूथ किती, मतदारांची (सामाजिक) वर्गवारी कशी आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काय कामे केली, असा प्रश्न विचारण्यात आला. शेवटचा प्रश्न तुम्हाला उमेदवारी का द्यावी, हा होता. या प्रश्नांची उत्तरे देताना अनेकांची भंबेरी उडत असल्याचे दिसून आले. उमेदवारांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे एका फॉर्ममध्ये लिहून घेतल्यानंतर मुलाखत घेणाऱ्या पक्षनिरीक्षकांनी त्यावर स्वाक्षरी करायची असते.
एबीसीडी कॅटेगिरी
इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये तो उमेदवारीसाठी पात्र आहे अथवा नाही, याबाबतचा गोपनीय अहवाल मुख्य समन्वय समितीकडे जाणार आहे. मुलाखत घेणाऱ्या निरीक्षकांनी उमेदवारांची एबीसीडी अशी कॅटेगिरी तयार केल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘ए’ कॅटेगिरीतील इच्छुक अन्य तीन कॅटेगिरीतील इच्छुकांपेक्षा सरस असल्याचे ठरविण्यात आले आहे.