लेकरांसह संपूर्ण कुटूंब संकटात
By Admin | Updated: January 11, 2015 00:55 IST2015-01-11T00:52:45+5:302015-01-11T00:55:34+5:30
उस्मानाबाद : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून रूईभर येथील तरूण शेतकऱ्याने ११ डिसेंबर रोजी आत्महत्या करून स्वत:ला संकटाच्या जोखडातून मुक्त करून घेतले.

लेकरांसह संपूर्ण कुटूंब संकटात
उस्मानाबाद : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून रूईभर येथील तरूण शेतकऱ्याने ११ डिसेंबर रोजी आत्महत्या करून स्वत:ला संकटाच्या जोखडातून मुक्त करून घेतले. परंतु, त्यांच्या जाण्याने आता वृद्ध आईसोबतच अपंग पत्नी दोन मुली अन् एक मुलगा असे अख्खं कुटुंबचं उघड्यावर आलं आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्यामुळे आता मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकण्याची वेळ अनिता जगताप यांच्यावर येवून ठेपली आहे.
रूईभर येथील तरूण शेतकरी बाबासाहेब माणिक जगताप हे जन्मत:च मुकबधीर आणि कर्णबधीरही होते. त्यांना फारशी जमीनही नव्हती. परंतु, आहे त्या सव्वा एकर क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नातून घरगाडा हाकित होते. त्यांच्या पत्नी अनिता या एका पायाने अपंग असतानाही तितक्याच हिमतीने त्यांना साथ देत. तसेच वडिलांचाही आधार होता. मात्र, मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने या सव्वा एकरातून सहा जणांचा उदरनिर्वाह होईल, इतकेही उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे बाबासाहेब आणि अनिता हे दोघेही मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकित होते. मध्यंतरी त्यांनी सोसायटीकडून कर्जही घेतले. परंतु, नापिकीमुळे त्याचीही परतफेड करता आली नाही. तसेच मुले जसजशी वरच्या वर्गामध्ये जात होती, तसतसा खर्चही वाढत गेला. यातूनही मार्ग काढत हे दाम्पत्य धिराने संसार करीत होते. असे असतानाच बाबासाहेब यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले. या घटनेनंतर मात्र, बाबासाहेब सातत्याने तनावाखाली असायचे. असे असतानाच त्यांनी ११ डिसेंबर २०१४ रोजी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याने संकटाच्या जोखडातून कुटुंबाची मुक्तता झाली नाही, तर उलट एका पायाने अपंग असलेल्या अनिता यांच्या खांद्यावर वृद्ध सासूचा सांभाळ करण्यासोबतच स्रेहल, जोत्सना व प्रमोद या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही येवून ठेपली आहे. त्याचप्रमाणे मुलींच्या विवाहाचा प्रश्नही आज ना उद्या उभा रहाणार आहे. एकूणच बाबासाहेब यांच्या जाण्याने अख्खं कुटुंबच संकटाच्या गर्तेत सापडले आहे. (प्रतिनिधी)