‘खास’दाराने लोकसभेत कोण जाणार?
By Admin | Updated: May 8, 2014 00:35 IST2014-05-08T00:33:33+5:302014-05-08T00:35:19+5:30
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निकालाचे काऊंटडाऊ न सुरू झाले असून आठ दिवसांवर आलेल्या मतमोजणीमुळे ‘खास’दाराने लोकसभेत कोण प्रवेश करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

‘खास’दाराने लोकसभेत कोण जाणार?
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निकालाचे काऊंटडाऊ न सुरू झाले असून आठ दिवसांवर आलेल्या मतमोजणीमुळे ‘खास’दाराने लोकसभेत कोण प्रवेश करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या २० दिवसांपासून कोण निवडणून येणार? याचीच चर्चा शासकीय कार्यालय, व्यापारी प्रतिष्ठाणे व चहाच्या टपर्यांवरही होतांना दिसून येत आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी १७ एप्रिल रोजी मतदान झाले. त्यामध्ये सहा विधानसभा मतदार संघातील १५ लाख ८५ हजार ३९६ मतदारांपैकी १० लाख ४८ हजार ८९७ मतदारांनी (६६.१६ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. उर्वरित ५ लाख ३६ हजार ४९९ मतदारांनी मतदानाकडे दुर्लक्ष केले. २००९ मध्ये झालेल्या मतदानात यावेळी जवळपास ७ टक्क्याने वाढ झाली आहे. वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात पडेल? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हिंगोली लोकसभेतून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी खरी लढत काँग्रेस- राष्टÑवादीचे उमेदवार आ. राजीव सातव व शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुभाष वानखेडे यांच्यातच होत आहे. हिंगोली लोकसभेतील सहा विधानसभा मतदार संघही काँग्रेस-राष्टÑवादीच्या ताब्यात असले तरी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बर्याच महत्वपूर्ण घडामोडी घडल्या. काँग्रेसच्या काही नेत्यानीच काँग्रेसच्या उमेदवाराचे काम केले नाही. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्टÑवादीच्याही काही नेत्यांनी आघाडी धर्म बाजुला ठेवून शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केली. पुरोगामी महाराष्टÑाच्या विचाराचे पाईक असल्याचे सांगून आतापर्यंत बहुजन विचारांशी बांधिल असल्याचा डांगोरा पिटणार्या काही नेतेमंडळींनी चक्क यावेळी विरोधात भूमिका घेतली व आतापर्यंतच्या पुरोगामीत्वाच्या भूमिकेला शह दिला. यामागे वैचारिक मतभेत नव्हते तर वैयक्तिक मतभेद असल्याचे समोर आले. त्यामुळे अशा रंग बदलणार्या नेते मंडळीचे खरे स्वरुप लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर समोर येणार आहे. काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात ज्या प्रमाणे राष्टÑवादी व काँग्रेसच्याच काही नेते मंडळींनी जसे काम केले तशीच काहीशी स्थिती शिवसेनेतही दिसून आली. गेल्या दोन वर्षांपासून अंतर्गत मतभेदाचा सामना करावा लागत असलेल्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीतही गटबाजीला सामोरे जावे लागले. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्टÑवादीच्या काही नेत्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी उंबरठे झिजविले तर शिवसेनेच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजुने लागले? हे सांगणेच अवघड झाले आहे. १६ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर जो काही निकाल येईल, त्यानंतर जिल्हाच्या राजकारणात मात्र मोठा बदल होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता असली तरी लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतील चित्र बदलेल, असेही जाणकरांना वाटते. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. राजीव सातव पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आ. राजीव सातव विजयी होतील की, शिवसेनेचे सुभाष वानखेडे, यावर लाखो रुपयांच्या पैजा लागल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय असो की जिल्हा परिषद कार्यालय, शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणे असो की चहाची टपरी असो, प्रत्येक ठिकाणी आपआपल्यापरीने कोणता उमेदवार विजयी होईल? याचे गणित मांडून उमेदवाराच्या विजयाचे चित्र रंगविले जात आहे. कोणत्या विधानसभा मतदार संघात कोणत्या उमेदवाराला लिड मिळेल, याचीही चर्चा चवीने केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला केवळ आठ दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येकाचीच निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मतमोजणीचे कॉऊंडडाऊन सुरू झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) निकालानंतर जिल्ह्याच्या राजकारणात बदल काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसच्या काही नेतेमंडळींनी निवडणुकीत शिवसेनेचे तर शिवसेनेच्या काही नेतेमंडळींनी काँग्रेसचे केले काम. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये पुरोगामीत्वाचा डांगोरा पिटणार्या नेतेमंडळींनी यावेळी स्वत:च्याच भूमिकेला दिला छेद. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हाच्या राजकारणात होणार मोठ्या घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाचा जिल्हा परिषदेच्या सत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होईल? याची प्रत्येक ठिकाणी केली जात आहे चर्चा. निवडणूक निकालानंतर अनेक नेत्यांचे पितळ पडणार उघडे. निकालावर अनेकांनी लावल्या पैजा.