याला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:05 IST2020-12-22T04:05:51+5:302020-12-22T04:05:51+5:30

‘सावित्री ज्योती’ ही महात्मा जोतिबा आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मराठी मालिका केवळ मालिकेला टीआरपी नाही ...

Who is responsible for this? | याला जबाबदार कोण ?

याला जबाबदार कोण ?

‘सावित्री ज्योती’ ही महात्मा जोतिबा आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मराठी मालिका केवळ मालिकेला टीआरपी नाही म्हणून बंद होत आहे, हे ऐकून नक्कीच मला दुःख झाले. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली जोतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका करणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचे कौतुक करावं तितकं कमीच आहे; पण मग चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर, कार्यावर आधारित मालिका पाहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा? नवऱ्याची लफडी, सासू-सुनांची भांडणं, येता-जाता एकमेकींवर कुरघोडी करणाऱ्या जावा, हे असं सगळं बटबटीत पहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का, असा प्रश्न आता उभा राहिला आहे. विनोदाच्या नावावर माकडचाळे करून नक्की विनोद कशाला म्हणायचं, असा प्रश्न पडावा; पण बघणारे काहीही करून हसत आहेत, यातच आपल्या अभिनयाचं श्रेय आहे, असं मानून काम आणि पैसे मिळाले की त्यातच सुख मानणारे कलाकार. बऱ्याचदा परिस्थितीमुळे अनेकांना हे करणं भाग पडतं; पण काही रिॲलिटी शोमध्ये विनोदाचा दर्जा आणि आब राखून लोकांचे लाडके ठरलेले गुणी विनोदी कलाकारही आहेतच.

अभिनयाची भूक असणारे ओमकार गोवर्धन, अश्विनी कासारसारखे कलाकार उत्तम अभिनय करूनही त्यांची मालिका फक्त प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होत असेल तर या कलाकारांना किती दुःख होत असेल, की जीव तोडून मेहनत घेऊन टीआरपीच्या धंदेवाईक स्पर्धेत त्यांची मालिका यशस्वी झाली नाही. सावित्री ज्योतीसारख्या उत्तम मालिका प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होते, याला जबाबदार काळानुसार बदलत चाललेली प्रेक्षकांची आवड की, आणखी कुणी ?

- महेश टिळेकर, निर्माता दिग्दर्शक

Web Title: Who is responsible for this?