नवीन कुलगुरू कोण? राजभवनात आयोजित कुलगुरूपदाच्या ‘टॉप फाइव्ह’ मुलाखती स्थगित
By राम शिनगारे | Updated: December 19, 2023 12:09 IST2023-12-19T12:09:01+5:302023-12-19T12:09:11+5:30
कुलगुरू शोध समितीने एकूण २४ उमेदवारांच्या प्राथमिक मुलाखती घेतल्यानंतर, ‘टॉप फाइव्ह’ नावे राज्यपालांना बंद लिफाफ्यात दिली आहेत.

नवीन कुलगुरू कोण? राजभवनात आयोजित कुलगुरूपदाच्या ‘टॉप फाइव्ह’ मुलाखती स्थगित
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंसाठी राजभवनात आयोजित केलेल्या १९ डिसेंबर रोजीच्या ‘टॉप फाइव्ह’च्या मुलाखती स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी राज्यपालांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिल्याचे समजते.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे नव्या कुलगुरूंची निवड अंतिम टप्प्यात पाेहोचली आहे. राज्यपालांनी नेमलेल्या कुलगुरू शोध समितीने एकूण २४ उमेदवारांच्या प्राथमिक मुलाखती घेतल्यानंतर, ‘टॉप फाइव्ह’ नावे राज्यपालांना बंद लिफाफ्यात दिली आहेत. त्यामध्ये पुणे विद्यापीठातील सांख्यिकीशास्त्राचे प्रोफेसर डॉ. विलास खरात, डॉ. संजय डागा ढोले, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील डॉ. ज्योती जाधव, डॉ. विजय फुलारी आणि नागपूर येथील डॉ. राजेंद्र काकडे यांचा समावेश आहे.
डॉ. काकडे हे दिल्लीतील एआयसीटीईमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये पाचही स्पर्धक उमेदवारांना राज्यपालांनी १९ डिसेंबर रोजी राजभवनात बोलावले होते. मात्र, राज्यपाल रमेश बैस यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे मुलाखती स्थगित करण्यात आल्याचा निरोप उमेदवारांना मिळाला. त्यानुसार या उमेदवारांना मुलाखतीसाठी लवकरच नवीन तारीख कळविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.