पश्चिम घाटातील ‘शीळ' घुटमळतोय औरंगाबादच्या नाल्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 16:42 IST2018-01-24T16:38:00+5:302018-01-24T16:42:06+5:30
गोड शीळ घालून आकर्षित करणारा आणि पश्चिम घाटात आढळणारा शिळकरी कस्तूर म्हणजेच मलबार व्हिसलिंग थ्रश औरंगाबादेतील नाल्यावर चक्क शिळे अन्न खाताना आढळला. पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी त्याला आपल्या कॅमेर्यात टिपला.

पश्चिम घाटातील ‘शीळ' घुटमळतोय औरंगाबादच्या नाल्यावर!
औरंगाबाद : गोड शीळ घालून आकर्षित करणारा आणि पश्चिम घाटात आढळणारा शिळकरी कस्तूर म्हणजेच मलबार व्हिसलिंग थ्रश औरंगाबादेतील नाल्यावर चक्क शिळे अन्न खाताना आढळला. पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी त्याला आपल्या कॅमेर्यात टिपला.
शिळकरी कस्तूर म्हणजेच गोड शीळ घालणारा सुंदर गायन करणारा पक्षी. याचे गायन म्हणजे शिट्टी स्वरूपात असते. जे ऐकताना माणूस शिट्टी मारतोय असा भास होतो. उन्हाळ्यात हा पक्षी उंचावर बसून मादीला आकर्षित करण्यासाठी गोड शीळ घालतो. हा देखणा पक्षी पश्चिम घाटातला रहिवासी आहे. हा पक्षी पहिल्यांदाच आपल्या परिसरात दिसला आहे. शनिवारी चिकलठाणा औद्योगिक क्षेत्राच्या एका दाट झुडपी प्रदेशात (भागात) नाल्याजवळ खरकटे अन्न खाताना पाठक यांना तो आढळून आला. चक्क शहर परिसरात मानवी वस्तीजवळ हा पक्षी आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. साधारणपणे पश्चिम घाटामध्ये धबधब्यांजवळ, नद्यांजवळ या पक्ष्याचे अस्तित्व असते आणि या ठिकाणी दाट झुडुपे आणि कड्याकपारीत हा पक्षी निवास करतो.
साधारणपणे २५ सें.मी. आकाराचा हा पक्षी काळपट आणि निळसर रंगाचा आहे. याची चोच, मान, गळा आणि पाय काळपट असून, याचा पिसारा हा निळसर गडद रंगाचा असतो. डोक्यावर निळा रंग असतो. हा पक्षी बेडूक, शिदोड, ओलसर भागात आढळणारे किडे आणि इतर जलचर तसेच फळे खाऊन जगतो. औरंगाबादेत मात्र तो नाल्यावर खरकटे अन्न खाताना दिसणे ही अजब बाब असल्याचे पाठक म्हणाले.