महिला सदस्य प्रश्न मांडत असतानाच राष्ट्रगीत सुरू
By Admin | Updated: July 1, 2014 01:07 IST2014-07-01T00:50:23+5:302014-07-01T01:07:36+5:30
औरंगाबाद : आमच्या मतदारसंघाच्या समस्या, प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला वेळच मिळत नाही, असे ठणकावत महिला सदस्य पुढे सरसावल्या खऱ्या; परंतु अचानक राष्ट्रगीताला सुरुवात झाली.

महिला सदस्य प्रश्न मांडत असतानाच राष्ट्रगीत सुरू
औरंगाबाद : आमच्या मतदारसंघाच्या समस्या, प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला वेळच मिळत नाही, असे ठणकावत महिला सदस्य पुढे सरसावल्या खऱ्या; परंतु अचानक राष्ट्रगीताला सुरुवात झाली. त्यामुळे महिला चक्रावल्या. मात्र, त्यांनी आपले म्हणणे ठासून सांगणे सुरूच ठेवल्यामुळे शेवटी राष्ट्रगीतच अर्ध्यावर थांबविण्याचा प्रकार सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घडला.
३२ गटांतून विजयी झालेल्या महिला व जिल्ह्यातील सात पंचायत समितींच्या सभापती ७ महिला, अशा ३९ महिला सदस्य जिल्हा परिषदेच्या सभागृहात आहेत, तर पुरुष सदस्यांची २८ संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला अध्यक्ष शारदा जारवाल यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात होताच, आम्हाला आमचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ द्या म्हणून महिला सुरुवातीपासूनच आग्रही होत्या. अगदी सुरुवातीपासूनच प्रत्येक महिला व पुरुष सदस्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाची री ओढणाऱ्या पुष्पा जाधव या दुष्काळी परिस्थितीत गाळ काढण्यासाठी महिला सदस्यांसाठी निधीची मागणी करत होत्या. सीईओ दीपक चौधरी यांनी त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देऊ, असे घोषितही केले. मात्र, त्यात आणखी ५० लाख रुपये वाढवावेत, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. तोच अचानक राष्ट्रगीत सुरू झाले. त्यामुळे सर्वच महिला सदस्यांनी ओरड सुरू केली. त्यामुळे राष्ट्रगीत अर्ध्यावरच थांबवावे लागले.
राष्ट्रगीत थांबल्यानंतर सर्वच महिलांनी आम्हाला वेळ मिळत नाही, असा आरोप केला. महिला सदस्यांच्या गटात ड्युयल डेस्क, ग्रीन बोर्ड, गाळ काढण्याची योजना आदी काहीच मिळाले नाही. शिवाय सभागृहात वेळही मिळत नाही, अशी ओरड त्यांनी सुरूच ठेवली होती. तोच पुन्हा राष्ट्रगीत सुरू झाले व अध्यक्षांनी सर्वसाधारण सभा संपल्याची घोषणा केली. सभेनंतर सुरेखा जाधव, नंदा काळे, सिंधू पिवळ, अनिता राठोड, संगीता मोटे आदींनी अध्यक्ष शारदा जारवाल यांची भेट घेऊन महिला सदस्यांना बोलण्यासाठी वेळ राखीव ठेवावा, अशी मागणी केली. महिला सदस्यांना बोलण्यास वेळ मिळायलाच हवा, अशी भूमिका अध्यक्ष शारदा जारवाल यांनी मांडली.
गाळ आणि राष्ट्रगीत
गेल्या वर्षी दुष्काळी कामे करताना गाळ काढण्यासाठी आलेला सर्व निधी फक्त १७ सदस्यांच्या गटात वापरला गेला. त्यामुळे या मुद्यावर चर्चा होऊच नये, अशी व्यूहरचना काही सदस्यांनी करून ठेवली होती. महिला सदस्य गाळाचा विषय उपस्थित करत होत्या, तर काही सदस्य नवनवीन चर्चेचे मुद्दे काढून महिलांचे मुद्दे भरकटून टाकत होते. सुरुवातीपासून नंदा काळे यांनी हा विषय लावून धरला होता. सभेच्या उत्तरार्धात तो चर्चेला येणार अशी चिन्हे दिसताच, राष्ट्रगीत वाजविण्याचा इशारा झाल्याची चर्चा सभा संपल्यानंतर सुरू झाली होती.