तेव्हा ‘राम-श्याम’ कुठे लपून बसले होते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:41 IST2017-09-12T00:41:59+5:302017-09-12T00:41:59+5:30
एरव्ही ऊठसूट ठाकरी भाषा वापरता. मराठा समाजावर अन्याय होत असताना कुठे जाते ही ठाकरी भाषा? असा खडा सवाल आज सायंकाळी येथे आमदार नितेश राणे यांनी विचारला.

तेव्हा ‘राम-श्याम’ कुठे लपून बसले होते?
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आरक्षण आणि अन्य अनेक मागण्यांसाठी मुंबईत मराठा समाजाचा भव्य मोर्चा निघाला, तेव्हा हे ‘राम... श्याम’ कुठे लपून बसले होते? का नाही आले बाहेर... टिळा लावून? एरव्ही ऊठसूट ठाकरी भाषा वापरता. मराठा समाजावर अन्याय होत असताना कुठे जाते ही ठाकरी भाषा? असा खडा सवाल आज सायंकाळी येथे आमदार नितेश राणे यांनी विचारला.
तापडिया नाट्य मंदिरात मराठा आरक्षण मेळाव्यात ‘मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा’ या विषयावर व्याख्यान देताना राणे यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यावर नाव घेत ही टीकेची झोड उठवली. मराठा आरक्षणासाठी लढत असलेले विनोद पाटील अध्यक्षस्थानी होते. किशोर शितोळे स्वागताध्यक्ष होते. विकास थाले पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
शिवसेनेतून मराठा समाज बाजूला करा आणि एक गाडी फोडून दाखवा म्हणावे, असे आव्हानच यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. शिवसेनेच्या किती खासदार, आमदारांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरला, हे जरा त्यांना विचारा. शिवसेनेचा भगवा झेंडा हा आमचा आहे. तो आमच्या महाराजांचा आहे, असेही त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले.
या बाबा पुरंदरेला शिवाजी पार्कवर महाराष्टÑ भूषण पुरस्कार दिला असता तर काय झालं असतं.? अशा प्रश्नांची सरबत्ती करीत पुण्यातील राम गणेश गडकरी पुतळा प्रकरणाचाही विषय काढला व पुष्कर क्षोत्रिय व जितेंद्र जोशी यांचे पिक्चर चालू द्यायचे की नाही? यांना समर्थन देऊन ताकद द्यायची का? हे आता ठरवण्याची वेळ आली आहे, असे नितेश राणे म्हणाले आणि महाराष्टÑ भूषण पुरस्कार द्यायचाच असेल तर मराठा आरक्षणाची केस लढवणाºया हरीश साळवे यांना द्या, असे सुचविले.
प्रत्येक जण राजे.....
आमदार नितेश राणे यांनी नावामागे राजे लावण्याच्या प्रकारावरही टीका केली. ते म्हणाले, आता प्रत्येक जण स्वत:च्या नावामागे राजे लावतोय. महाराष्टÑात दोन-तीन राजे माहीत आहेत, उदयनराजे आणि संभाजीराजे; पण आता जो उठतो तो स्वत:च्या नावामागे राजे लावतोय. मग मुजरे तरी कु णाकुणाला घालायचे?
शेवटी हरहर महादेवचा गजर करीत त्यांनी आपले भाषण संपवले. त्यावेळी ‘एक मराठा....लाख मराठा’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, अशा घोषणा निनादत होत्या.
केजी टू पीजी शिक्षण मोफत करा...
मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना केजी टू पीजीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याची मागणी अध्यक्षीय समारोपात विनोद पाटील यांनी केली. मराठा आरक्षणात जो जो आडवा येईल, त्याला आडवा करू असे सांगत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत आता राज्य सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे. आम्ही फक्त शैक्षणिक आरक्षण मागितले आहे. नोकºयांमधले आरक्षण मागितले आहे; पण इथल्या सरकारला आरक्षणापेक्षा दारू दुकानांचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. आमची लढाई कुणाविरुद्धही नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
अॅड. के. जी. भोसले यांचेही यावेळी भाषण झाले. मंचावर अभिजित देशमुख, अॅड. व्ही. डी. सोळुंके, अनुराधा चव्हाण, अशोक पा. मुळे, अॅड. स्वाती नखाते, अॅड. सुवर्णा मोहिते, ऋचा शिंदे आदींची उपस्थिती होती. दत्ता हूड पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी दोन मिनिटे स्तब्धता पाळून राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष दिवंगत म्हसे पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या मेळाव्याच्या निमित्ताने तापडिया नाट्य मंदिर खचाखच भरले होते.