फक्त कमाईवरच भर! पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरात कुठेय ‘ग्रीन इन्व्हेस्टमेंट’?

By संतोष हिरेमठ | Published: September 27, 2023 01:35 PM2023-09-27T13:35:38+5:302023-09-27T13:36:44+5:30

जागतिक वारसास्थळावरील स्थितीकडे राज्य शासनाचा ‘कानाडोळा’च

Where is the 'green investment' in tourism city Chhatrapati Sambhajinagar? | फक्त कमाईवरच भर! पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरात कुठेय ‘ग्रीन इन्व्हेस्टमेंट’?

फक्त कमाईवरच भर! पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरात कुठेय ‘ग्रीन इन्व्हेस्टमेंट’?

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. यंदा या दिनाची ‘पर्यटन आणि हरित गुंतवणूक’ (टुरिझम अँड ग्रीन इन्व्हेस्टमेंट) ही संकल्पना आहे. राज्याची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरचा नेहमीच गौरवाने उल्लेख केला जातो. मात्र, या पर्यटननगरीत ‘ ग्रीन इन्व्हेस्टमेंट’ वाढीची प्रतीक्षाच आहे.

देवगिरी किल्ल्यात (दौलताबाद) एका दिवसात ३०० वर पाण्याच्या बाटल्यांचा ढीग गाेळा करावा लागे. आता या ठिकाणी पर्यटकांकडे प्लास्टिकची पाण्याची बाटली असेल तर त्यांच्याकडून सुरक्षा ठेव म्हणून २० रुपये घेतले जातात. किल्ला पाहून आल्यावर बाटली दाखवून २० रुपये परत घेता येतात. असाच प्रयत्न इतर पर्यटनस्थळीही करण्याची गरज आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे अजिंठा लेणीतील चित्रांना धोका संभवतो. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी फर्दापूर टी पाॅइंट ते लेणी मार्गावर एस.टी. बसेस धावत आहेत. वेरुळ लेणीत ई-वाहने धावत आहेत. अजिंठा लेणीसाठी प्रतीक्षाच आहे.

महिनाभरात कुठे किती पर्यटक? (ऑगस्ट)
स्थळ- भारतीय पर्यटक- परदेशी पर्यटक

- वेरूळ लेणी- ७८,५५५-४१३
- बीबी का मकबरा- ५४,२८२-२२८
- अजिंठा लेणी - २७,५७८-३४०
- देवगिरी किल्ला (दौलताबाद किल्ला) - ३३,११४-१११

प्रत्येकाने वारसा जोपासावा
पर्यटन दिनानिमित्त भारतीय पर्यटनाच्या सहकार्याने जनजागृतीपर कार्यक्रम घेत आहोत. ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम चालू आहे. पर्यटकांनी आपला सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.
- डाॅ. शिवकुमार भगत, अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद), भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

‘कार्बन फूट प्रिंट’ कमी रहावे
हरित गुंतवणूक म्हणजे अशी गुंतवणूक ज्यातून स्थानिक पर्यटनावर ‘कार्बन फूट प्रिंट’ कमी राहील. पर्यटनासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर, स्थानिकांशी जबाबदारपणे वागणे, सिंगल युज प्लास्टिक, प्लास्टिक बाटल्यांचा वापर न करणे इ. गरजेचे ठरते.
- चंद्रशेखर जयस्वाल, महाव्यवस्थापक, एमटीडीसी

वेगळ्या पर्यटनाचाही व्हावा विचार
ऐतिहासिक स्थळांबरोबर आता वेगळ्या पर्यटनाचाही विचार झाला पाहिजे. गोदावरी नदीच्या बँक वाॅटरमध्ये बोटिंग, वेरुळ लेणीत रोपवेसाठी प्रयत्न केला पाहिजे. टेकड्यांवर जाणाऱ्यांनी जाताना झाडे लावली पाहिजेत आणि येताना ठिकठिकाणी पडून असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा कराव्यात.
- जयंत गोरे, अध्यक्ष, मराठवाडा टुरिझम डेव्हलपमेंट चेंबर

आम्हीही प्रयत्नशील
‘ग्रीन इन्व्हेस्टमेंट’ ही यंदाची थीम आहे. या दृष्टीने आम्हीही प्रयत्नशील आहोत आणि यापुढेही राहू.
- उमेश जाधव, सचिव, टुरिस्ट गाईड्स वेल्फेअर असोसिएशन

Web Title: Where is the 'green investment' in tourism city Chhatrapati Sambhajinagar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.