फुले मार्केट कधी होणार?
By Admin | Updated: April 4, 2016 00:38 IST2016-04-04T00:24:26+5:302016-04-04T00:38:47+5:30
जालना : शहरातील केंद्रस्थानी असलेल्या महात्मा फुले मार्केट पुनर्बांधणीची प्रक्रिया कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

फुले मार्केट कधी होणार?
जालना : शहरातील केंद्रस्थानी असलेल्या महात्मा फुले मार्केट पुनर्बांधणीची प्रक्रिया कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. गत पाच वर्षांपूर्वी धोकादायक इमारत पाडून त्या जागी उत्कृष्ट व्यापारी संकुल उभारण्याचे स्वप्न पालिकेने दाखविले होते. प्रत्यक्षात हे स्वप्न अद्यापही कागदावरच आहे. पाच वर्षांनंतरही साधी निविदा पूर्ण करण्याचे धाडसही पालिकेने दाखविले नाही.
जुनी इमारत पाडल्याने अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. चालू व्यवसाय बंद करावा लागला. काहींना नवीन दुकाने खरेदी करावी लागली. व्यापाऱ्यांचे हाल होत असले तरी पालिका लालफितीचा कारभार सोडण्यास तयार नाही. विशेष म्हणजे दोनदा निविदा काढूनही उपयोग झालेला नाही.
सिंधी बाजार परिसरात दोनशेपेक्षा अधिक दुकाने असलेली महात्मा फुले मार्केटच्या इमारतीस साठ वर्षे झाले होते. ही इमारत जीर्ण झाल्याने ती कोसळण्याचा धोका होता. व्यापारी व पालिका यांच्यातील दीर्घ चर्चेनंतर पाच वर्षांपूर्वी ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. इमारत तयार न झाल्याने पालिकेला मिळणारे वार्षिक उत्पन्नही बुडत आहे. या उत्पन्नातून पालिका शहर विकास साधू शकते. राजकीय आणि प्रशासकीय वादात हा मुद्दा रखडत आहे. सदर इमारतीच्या बांधकामासाठी ई-टेंडर निघणार आहे. पाच मजल्यांची ही नवीन इमारत असेल असे सांगितले जाते. सुमारे २८ ते ३० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया असेल असा अंदाज नगरपालिकेतील सूत्र व्यक्त करतात. जून व जुलै २०१५ या महिन्यात यासाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र दोन्ही वेळेस कंत्राटदाराचा प्रतिसाद मिळाला नाही.
आज रोजी दीड एकरचा हा परिसर आहे. या परिसरात पाच मजली सुसज्ज मार्केट असेल. यातून २८३ दुकाने निघतील असा पालिकेतील बांधकाम तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातील काही दुकाने व्यापाऱ्यांना द्यावी लागणार आहेत. त्यामुळे व्यापाऱांना किती, कंत्राटदराचा हिस्सा किती, वाहनतळाची व्यवस्था काय आदी विविध मुद्यांवरून ही निविदा प्रक्रिया दर वेळेस रखडत आहे.
शहरातील मध्यभागी ही जागा आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे काही जागेवर उकिरडा तर काही ठिकाणी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपले बस्तान मांडले आहे. छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून किती रक्कम घेतली जाते हा संशोधनाचा विषय आहे. एकूणच या जागेवर सुसज्ज इमारत कधी उभारणार असा प्रश्न व्यापाऱ्यांसोबतच नागरिकांनाही पडला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईत मुले मार्केटच्या विकासा संदर्भात चर्चा झाली होती. परंतु ही चर्चा चर्चाच राहिली. यातून काहीच निष्कर्ष निघू शकला नाही. पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.