जालना शहर एलईडी दिव्यांनी उजळणार कधी?
By Admin | Updated: April 25, 2016 23:27 IST2016-04-25T23:14:19+5:302016-04-25T23:27:44+5:30
जालना : नगर पालिकेने पथदिव्यांच्या थकित वीज बिलामुळे महावितरणने दिव्यांचा पुरवठा अनेक दिवसांपासून बंद केलेला आहे.

जालना शहर एलईडी दिव्यांनी उजळणार कधी?
जालना : नगर पालिकेने पथदिव्यांच्या थकित वीज बिलामुळे महावितरणने दिव्यांचा पुरवठा अनेक दिवसांपासून बंद केलेला आहे. काही भागात अनधिकृतपणे दिवे सुरू आहेत. जास्त क्षमतेच्या दिव्यांऐवजी एलईडी दिवे बसविण्याच्या प्रस्तावास नगर पालिकेने सर्वसाधारण सभेत मान्यता दिली होती. यानुसार सर्व्हेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे, मात्र प्रत्यक्षात दिवे कधी लागणार आणि प्रकाश कधी पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात विविध खांबांवर जुने शंभर वॅट किंवा त्या पेक्षा अधिक वॅटचे पथदिवे लावलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. हे दिवे खराब झाल्यास नवीन लावण्यासाठी मोठा खर्च येतो. खर्च जास्त असल्याने नगर पालिकेकडून हे पथदिवे बदलण्यासाठी चालढकल केली जाते. त्यातच महावितरण कंपनीने पथदिव्यांचा पुरवठा बंद केल्याने प्रश्न गंभीर बनला आहे. जुन्या पथदिव्यांमुळे खर्चिक बाब टाळण्यासाठी नगर पालिकेने कमी क्षमतेचे, जास्त प्रकाश देणारे व वीज बिलात बचत होण्यासाठी ३६ वॅट अथवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचे दिवे खरेदी करण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेतला खरा. प्रत्यक्षात सर्व्हेक्षण झाल्याचे सांगण्यात येते. एलईडी पथदिवे लागणार याची माहिती कोणाकडचे नाही.
आजरोजी शहरात १२ हजारपेक्षा पथदिवे आहेत. हे सर्वच दिवे बदलून त्या जागी एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. यासाठी एलईडी पुरवणाऱ्या कंपनीकडून सर्व्हेक्षणही करण्यात आले आहे.
शहरातील विविध भागांत अजा जुनाट पद्धतीचे व जास्त वीज लागणारे दिवे आहेत. हे सर्व काढून त्या जागी १५ हजार एलईडी दिवे बसविण्यात येणार असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. या संबंधीचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून, या संबंधी निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन हे दिवे लावले जातील.
४नवीन एलईडी दिव्यांमुळे पालिकेच्या वीज बिलांत महिन्याकाळी ४० ते ६० टक्क्यांची बचत होणार असल्याचे वीज तज्ज्ञ सांगतात. एलईडी दिव्यांनी वीज कमी लागते. तसेच दुरूस्तीचे कमी असल्याने आयुष्यमान चांगले असते. यामुळे पालिकेचे वीजबिल कमी येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
पालिकेचे विद्युत अभियंता पोलास यांना आठ ते दहा वेळेस भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनही त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यांनी मोबाईल डायव्हर्ट केला होता. त्यामुळे विशेष म्हणजे सायंकाळी सात वाजेपर्यंत पोलास यांचा फोन बंदच होता. मस्तगड येथील विद्युतपंपाबाबत माहितीही पोलास यांच्याकडून मिळू शकली नाही.